जशास तसं उत्तर... काँग्रेसने चंद्रपूरचा बदला भिवंडीत घेतला; भाजपाच्या बंडखोरालाच केला महापौर

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election Big Shock To BJP: भारतीय जनता पार्टीला काँग्रेसने मोठा धक्का दिला असून भाजपाचाच बंडखोर उमेदवार काँग्रेसने महापौरपदी निवडून आणला असून हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 20, 2026, 01:38 PM IST
जशास तसं उत्तर... काँग्रेसने चंद्रपूरचा बदला भिवंडीत घेतला; भाजपाच्या बंडखोरालाच केला महापौर
भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election Big Shock To BJP: भारतीय जनता पार्टीने चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने कमी संख्याबळ असतानाही ऐनवेळी केलेल्या राजकीय खेळीच्या माध्यमातून महापौर बसवला त्याचा वचपा काँग्रेसने मुंबई शेजारच्या भिवंडीमध्ये काढला आहे. भाजपाने त्या पद्धीतने चंद्रपूरमध्ये खेळी केली तशीच काहीशी राजकीय खेळी काँग्रेसने भिवंडीमध्ये केल्याचं दिसून आलं. भारतीय जनता पार्टीने आधी महापौरपदासाठी जो उमेदवार दिला होता तो मागे घेतला. मात्र त्यानंतर या उमेदवाराने काही नगरसेवकांसहीत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाला काँग्रेसने पाठींबा दिला आणि भाजपाने दिलेलाच उमेदवार महापौर म्हणून निवडून आणला आहे. भिवंडीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर बंडखोर नगरसेवक महापौर होणं हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे भाजपाची 6 मतं फुटली. 

Add Zee News as a Preferred Source

कोणाला किती मतं?

बंडखोरी करणारे नारायण चौधरी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत. नारायण चौधरींना 48 मतं मिळाली असून भाजपाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या स्नेहा मेहुल पाटील यांना अवघी 16 मतं मिळाली. त्यामुळेच भाजपाचे बंडखोर असलेले नारायण चौधरी हे काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आले आहेत.

चौधरींनी बंडखोरी का केली?

भाजपने प्रथम नारायण रतन चौधरी (नारायण चौधरी) यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली होती. नंतर अचानक स्नेहा मेहुल पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे नारायण चौधरींनी भाजपाच्या नाराज नगरसेवकसेवकांसहीत 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून महापौर पदाचे इच्छुक उमेदवार असलेले नारायण चौधरी यांनी भाजपसोबत न जाता सात नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली. या आठ जणांच्या गटापैकीच काँग्रेससोबत सहभागी होऊन त्यांच्यातीलच एखादा नगरसेवक महापौर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आणि झालेही तेच. काँग्रेस + राष्ट्रवादी + बंडखोर भाजप गट = 51+ जागा होत असल्याने काँग्रेसने दिलेला उमेदवार निवडून येईल हे स्पष्टच होतं. 51 ऐवजी 48 मतं चौधरी यांना मिळाली. 

निकालानंतर संभ्रमावस्था

महानगरपालिकेत आघाडी किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रमावस्था होती. मात्र निवडणुकीत काँग्रेस पक्षला सर्वाधिक जागांवर यश मिळाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी छोट्या पक्षांचे आणि अपक्षांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले होते. 

भिवंडी महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?

काँग्रेस - 30
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस -12
शिंदे शिवसेना - 12
भाजपा - 22
कोणार्क विकास आघाडी - 5
समाजवादी पक्ष - 6
भिवंडी विकास आघाडी - 3

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More