भाजपाला मोठा धक्का! महापौरपदाचा उमेदवारच फुटला; वेगळा गट करुन काँग्रेसला मतदान

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: राज्यातील निवडणुकांचा निकाल लागून एका महिन्याहून अधिक काळ उलटला असूनही शहराला महापौर मिळालेला नाही. म्हणूनच आज महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार असून महापौर कोण होणार याबद्दची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 20, 2026, 09:34 AM IST
भाजपाला मोठा धक्का! महापौरपदाचा उमेदवारच फुटला; वेगळा गट करुन काँग्रेसला मतदान
भाजपाला बसणार मोठा धक्का (प्रातिनिधिक फोटो)

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक होत असून यंदा राजकीय चित्र वेगळे व अनपेक्षित वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या इतिहासाकडे पाहिल्यास, भिवंडी महानगरपालिका मध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजातील महापौर निवडून येत असल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र यंदा हे समीकरण बदलताना दिसत आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकी कोणाची वर्णी लागणार?

महानगरपालिकेत आघाडी किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत सुरुवातीला संभ्रमाची स्थिती होती. मात्र निवडणुकीत काँग्रेस पक्ष ला सर्वाधिक जागांवर यश मिळाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी छोट्या पक्षांचे आणि अपक्षांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

महापौर पदाचा उमेदवारच का फिरला?

दरम्यान, भाजपकडून महापौर पदाचे इच्छुक उमेदवार असलेले नारायण चौधरी यांनी भाजपसोबत न जाता सात नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या गटाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात असून या आठ जणांच्या गटापैकीच काँग्रेससोबत सहभागी होऊन त्यांच्यातीलच एखादा नगरसेवक महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापौरपदाचा उमेदवारच का फुटला?

भाजपने प्रथम नारायण रतन चौधरी (नारायण चौधरी) यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली होती. नंतर अचानक स्नेहा मेहुल पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे नारायण चौधरींनी भाजपाच्या नाराज नगरसेवकसेवकांसहीत 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'मध्ये प्रवेश करत काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळेच काँग्रेस + राष्ट्रवादी + बंडखोर भाजप गट = 51+ जागा होत असल्याने हे समीकरण तसेच बहुमत निश्चित मानलं जात आहे. 

ही भाजपाचीच रणनिती?

या घडामोडींमुळे यंदा भिवंडी महानगरपालिकेत अल्पसंख्यांक महापौर न होता वेगळेच राजकीय चित्र समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण राजकीय हालचाल भाजपचीच एक रणनीती असू शकते अशा चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काय होतं? कोण कोणाच्या बाजूने मतदान करतं हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं असूनह इथेही चंद्रपूर पॅटर्न पद्धतीने अखेरच्या खेळीत भाजपा सर्वांना चितपट देणार का हे पहावं लागणार आहे. 

भिवंडी महानगरपालिकेत निवडून आलेले पक्षनिहाय नगरसेवक

काँग्रेस - 30
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस -12
शिंदे शिवसेना - 12
भाजपा - 22
कोणार्क विकास आघाडी - 5
समाजवादी पक्ष - 6
भिवंडी विकास आघाडी - 3

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More