जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? सोलापुरात काय घडतंय? जाणून घ्या!

Solapur ZP elections: राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशात नगरपरिषद आणि महानगरपालिकानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नेत्यांचे पक्षप्रवेश आणि भेटीगाठी होत आहेत. दरम्यान सोलापूर झेपीसाठी दोन्ही शिवसेना युतीने लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पक्षातील वरिष्ठ आमि स्थानिक कार्यकर्तांमधील विरोधाभासच्या चर्चेंना उधाण आलं आहे 

प्रिती वेद | Updated: Jan 24, 2026, 10:15 AM IST
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? सोलापुरात काय घडतंय? जाणून घ्या!

Solapur Upates: सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र येत नवी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, या युतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचाही सहभाग असून भाजपविरोधात मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

बार्शी तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग

बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही महाआघाडी अधिक ठळकपणे पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर भाजपला थेट आव्हान देण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असून, राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या भूमिकांमुळे वेगळे असलेले पक्ष आता स्थानिक निवडणुकीसाठी एकत्र येत असल्याने ही युती महत्त्वाची मानली जात आहे.

दिलीप सोपल यांचे आवाहन आणि प्रचाराची तयारी

या महाआघाडीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्ते आणि नागरिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या एकत्रित लढ्याला लोकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी जोरदार प्रचार करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या पोस्टनंतर राजकीय हालचालींना आणखी वेग आला असून, प्रचाराच्या रणनीती आखल्या जात आहेत.

कोण कोणाच्या विरोधात?

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी रिंगणात उतरणार आहे. तर भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नेतृत्व असणार आहे. त्यामुळे ही लढत थेट दोन मोठ्या राजकीय ताकदींमध्ये होणार असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व यावर निवडणूक केंद्रित राहण्याची शक्यता आहे.

विरोधाभासामुळे वाढले गोंधळ

राज्य पातळीवर एकीकडे संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याबाबत ठाम नकाराची भूमिका मांडलेली आहे. मात्र, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. या विरोधाभासामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, स्थानिक राजकारणात व्यवहार्य निर्णय कसे घेतले जातात याचे हे उदाहरण मानले जात आहे.

हे ही वाचा: अकोल्यात काँग्रेस भाजपला शह देणार? स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता संघर्षाची लढाई तीव्र

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

या महाआघाडीमुळे सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात प्रचार, मेळावे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

About the Author

Priti Ved

प्रिती अतुल वेद या राजकारण, लाईफस्टाईल तसेच विविध घडामोडींवर लेखन करतात. मनोरंजन आणि फिचर स्टोरीजमध्ये त्यांना विशेष रुची आहे. आध्यात्मिक पुस्तकांविषयी माहिती असून इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करायला आवडते. त्यांनी पत्रकारितेत पदवी शिक्षण घेतलं असून के. जे. जोशी महाविद्यालयात त्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.  ...Read More