राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी! ...तर वयाच्या सत्तरीपर्यंत करता येणार काम; पगार 80 हजार

Big News For Government Employee In Maharashtra: राज्य सराकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2025, 09:12 AM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी! ...तर वयाच्या सत्तरीपर्यंत करता येणार काम; पगार 80 हजार
राज्य सरकारचा मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो)

Big News For Government Employee In Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्या सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येईल असा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता 58 व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत सेवेत राहता येईल.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

शासकीय तसेच निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने घेण्यावर मात्र राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय झाला नसला, तरी या नव्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वयाच्या 65 वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत काम करता येणार आहे.

'त्या' कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी नाही

'अ' व 'ब' गट संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. गट 'क' व गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येणार नाही. कोणतीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यास निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार नाही. या अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी असलेले मूळ निवृत्तीवेतन व इतर भत्ते दिले जाणार आहेत.

नक्की वाचा >> आता 9 नाही 10 तासांची शिफ्ट करावी लागणार! प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा आदेश; संतापाची लाट

भरघोस पगाराची तरतूद

सरकारी आस्थापनांत अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या 10 टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना 80 हजारांपर्यंत वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच निवृत्तीचं वय 58 असलं तरी शरीराने साथ दिल्यास वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिना 80 हजार रुपयांची नोकरी या माध्यमातून करता येणार आहे.

कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध

एकीकडे सरकार निवृत्तीचे वय 60 वर्षांवर नेण्याचा निर्णय घेत नाही आणि दुसरीकडे निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेत आहे राज्य सरकारला खरोखर त्यांची सेवe घ्यायची असेल, तर निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. तसेच दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांनाच कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार सरकारने करावा अशीही चर्चा आहे.