Maharashtra News : महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये एकावेळी मोठा घोटाळा झाला आहे. आरोग्य विभागात वाहन घोटाळा झाला आहे. कागदावरच्या वाहनांसाठी 11 कोटी रुपये मोजले. 35 जिल्ह्यांत 1213 वाहनं पुरवठ्यात हा घोटाळा झाला. आरोग्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन घोटाळा केल्याचा संशय आहे. सरकारी योजनेत ठेकेदाराचा फसवाफसवीचा खेळ पहायला मिळत आहे. 3 महिन्यांचं जवळपास अकरा कोटींचं बील काढण्याचा डाव होता. आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा झी २४ तासच्या एसआयटीकडून पर्दाफाश करण्यात आला.
आरोग्य विभागात भाडोत्री वाहन घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. नवं सरकार आणि नव्या आरोग्यमंत्र्यांनी सूत्रं स्वीकारल्याच्या अवघ्या चार दिवसांत या वाहन कंत्राटाची वर्कऑर्डर काढण्यात आली. कंत्राट मिळवणा-या ठेकेदाराची शेकडो वाहनं कागदावर धावतायेत. एवढंच नाही तर कंत्राटदारानं कंत्राटाच्या अटीशर्थीही पाळल्या नाहीत.
झी 24 तासनं वाहन पुरवठादाराचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर ठेकेदाराच्या कामाचा रिऍलिटी चेक करण्याचा निर्णय घेतला. झी 24 तासनं राज्यभरातील 35 जिल्ह्यात ठेकेदाराची वाहनं तैनात आहेत का याची परिस्थिती जाणून घेण्याचा निर्णय़ घेतला. वाहन पुरवठ्याच्या कंत्राटाचा पंचनामा झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेटिंग टीमनं केला. त्यात समोर जी तथ्यं आली ती हादरवून सोडणारी होती. भंडारा जिल्ह्यात झी 24 तासची एसआयटी पोहचली. तिथलं वास्तव तर भयानक होतं.. भंडारा जिल्ह्यासाठी 16 वाहनं देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ठेकेदारानं दिलेली यादी आम्ही लक्षपूर्वक पाहिली.
यातील एमएच-14 एफव्ही 8876 हा वाहन क्रमांक चेक केला. हा वाहन क्रमांक चक्क एका स्कुटीचा निघाला. याचा अर्थ हे वाहन कागदावर धावत होतं. दुसरा एक वाहन क्रमांक आमच्या नजरेतून सुटला नाही. हा क्रमांक होता एमएच- 31 ईक्यू 0809. धक्कादायक बाब म्हणजे या क्रमांकाचं वाहनच महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली. याचा अर्थ सोळा पैकी 14 वाहनंच भंडा-यात अस्तित्वात होती. आता आम्ही अस्तित्वात असलेली वाहनं आणि त्या वाहनात वैद्यकीय पथकं तपासणीसाठी गावोगावी जातात का याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.
कागदपत्रांनुसार 27 फेब्रुवारीला भंडारा तालुक्यातल्याच माटोरा गावात तपासणी शिबीर झाल्याची माहिती होती. मग आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही माटोरा या गावातील अंगणवाडीत गेलो. तिथं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचं पथक कधी आलं होतं याची चौकशी केली. तेव्हा जे ऐकलं ते धक्कादायक होतं.आम्ही तिथूनच जवळ असलेल्या बेलगावात गेलो. तिथल्या सरपंचांना आम्ही आरोग्य विभागाच्या पथकाकडून लहान मुलांची तपासणी झाली का याबाबत चौकशी केली. त्या सरपंचांनीही आरोग्य विभागानं दावा केलेल्या दिवशी तिथं कोणत्याच प्रकारची तपासणी झाली नसल्याचं सांगितलं.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातला सावळागोंधळच समोर आला. याबाबत आम्ही भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पर्यवेक्षक केवल सीलेकर यांची भेट घेतली. त्यांना झालेला प्रकार सांगितला... सुरुवातीला त्यांना ताकास तूर लागू दिली नाही. पण जेव्हा एसआयटीकडं भक्कम पुरावे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी कामात अनियमितता असल्याची कबुली दिली. जी वाहनं भंडारा जिल्ह्यात धावत होती त्या वाहनांचे इन्शोरन्सची मुदत संपली होती. शिवाय त्या वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेटही नव्हतं. या बाबत एसआयटीनं पर्यवेक्षकांना विचारलं असता त्यानं ठेकेदाराकडं बोट दाखवलं.
वाहनं जुनी कशी याची चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. भंडारा जिल्ह्यात जी वाहनं धावत होती ती वाहनं 2019साली कंत्राट घेतलेल्या जुन्या ठेकादाराची असल्याची माहिती समोर आली. नव्या ठेकेदाराची वाहनं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जुनीच वाहनं वापरात असल्याची माहिती समोर आलीये. आरोग्य विभागातील वाहन घोटाळ्याचा तपास करताना जळगावात तर याहून धक्कादायक बाब उघडकीस आलीये. जळगावात वाहन ठेकेदारानं एक सबकॉन्ट्रॅक्टर नेमला.... त्या सबकॉन्ट्रॅक्टरनं आणखी तीन सबकॉन्ट्रॅक्टर नेमला.... कंत्राटदारानं दुस-याला कंत्राट देऊ नये असा नियम असतानाही ते नियम धाब्यावर बसवण्यात आले.