BJP Candidate List : विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एक उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान भाजपकडून कोणाला संधी देण्यात आली आणि राष्ट्रवादी शिवसेनेकडून कोणाची नावं चर्चेत आहेत. पाहुयात सविस्तर
विधानपरिषेदच्या पाच रिक्त जागांसाठी भाजपकडून नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, संभाजीनगरचे शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर दादाराव केचे यांनी भाजपपक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचं देखील दादाराव केचे यांनी म्हटलं आहे. तर दिलेली जबाबदार योग्य रितीने पार पाडणार असल्याचं संदीप जोशी यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत संदीप जोशी?
2002 ते 2022 असे सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2020-21 मध्ये ते महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रचार यंत्रणा संदीप जोशी यांनी सांभाळली आहे. 2020 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीमुळे संदीप जोशी यांचा पराभव झाला होता.
कोण आहेत संजय केणेकर?
संभाजीनगरच्या महानगरपालिकेत उपमहापौर म्हणून संजय केणेकर यांनी काम केलंय. अखिर भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सातत्याने वेगवेगळी आंदोलनं करणारा भाजपचा कार्यकर्ता अशी केनेकर यांची ओळख.
दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एका जागेसाठी अनेक नेते इच्छूक आहेत. शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी, संजय मोरे, रवींद्र फाटक, किरण पांडवांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी, संग्राम कोते आणि संजय दौंड यांच्या नावाची चर्चा आहे
5 आमदारांचं विधानपरिषदेचं सदस्यत्व रद्द
भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमश्या पाडवी या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली आहे. विधानसभेवर निवडून गेल्यानं या पाचही जणांची विधापरिषदेची आमदारकी संपुष्टात आली. त्यामुळे या पाच जागांसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.