केजरीवालांच्या मद्य घोटाळ्याचं मातोश्री कनेक्शन? `उद्धव ठाकरेंनाही अटक होणार`, भाजपा नेत्याचा दावा
Nitesh Rane on Uddhav Thackeray: ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, जर उद्धव ठाकरेंनाही अटक झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं भाजपा नेते नितेश राणे म्हणाले आहेत.
Nitesh Rane on Uddhav Thackeray: सक्तवसुली संचलनालयाने मद्यगैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी उद्धव ठाकरेंनाही अटक केली जाऊ शकते असा दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मद्य घोटाळ्याचं मातोश्री कनेक्शन काय आहे याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगारांनी दिलं पाहिजे असं नितेश राणे म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, "आज सकाळी संजय राऊत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरुन भाजपाच्या नेत्यांवर आगपाखड करत होते. पण यानिमित्ताने मला काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवर अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे. ती भेट नेमकी कशासाठी होती?".
"ती राजकीय भेट होती, सदिच्छ भेट होती की त्या भेटीमागे मद्य घोटाळ्याचं मातोश्री कनेक्शन जोडलेलं होतं. याचं कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना दिल्लीच्या सरकारने मद्य धोरणावर शिक्कामोर्तब केलं त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या सरकारने येथेही 50 टक्के कर सवलत जाहीर केली होती. मग ती मातोश्रीवरील भेट नेमकी कशासासाठी होती? त्यात खोक्यांची की कंटेनरांची चर्चा झाली?," अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.
मद्य घोटाळ्याचं मातोश्री कनेक्शन काय आहे याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगारांनी दिली पाहिजे. काल मफलरला अटक झाली, आता येणाऱ्या दिवसात मानेचा पट्टा लावणाऱ्याला अटक झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.