महाजनांचा लावा रे तो व्हिडीओ, शिवसेनेला घेरलं

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातलं राजकारण प्रचंड तापलं आहे. एकीकडे शिंदे गटाच्या महानगरप्रमुखांवर भाजपा ड्रग्स पेडलिंग आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करत आहे तर दुसरीकडे प्रचारादरम्यान उमेदवारावर थेट बंदूक ताणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय घडलंय नाशिकमध्ये? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 13, 2026, 10:09 PM IST
महाजनांचा लावा रे तो व्हिडीओ, शिवसेनेला घेरलं

योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : निवडणुकीच्या धामधुमीत यंदा नाशिक केंद्रस्थानी राहिलं. तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा असेल, सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर केलेलं आंदोलन असेल, तिकीट न मिळाल्यानं भाजपातल्या इच्छुकांनी शहराध्यक्षाचा पुरवलेला पिच्छा असेल..या ना त्या मुद्द्यांमुळे नाशिक चर्चेत राहिलं. आता इथल्या निवडणूक प्रचारानं गंभीर वळण घेतलंय. कारण भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद उफाळून आलाय.  भाजपानं शिंदे गटाच्या सेनेचे नाशिक महानगरप्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 मधले उमेदवार प्रवीण तिदमेंवर थेट जाहीर सभेत गंभीर आरोप केले. मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत व्हिडिओ क्लिप दाखवत, शिंदेंचे उमेदवार तिदमेंचे एमडी ड्रग्स पेडलरसोबतचे कथित व्हिडिओ सादर केले. तसंच बिल्डरांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला.

Add Zee News as a Preferred Source

यावर भाजपाचे आरोप तिदमेंनी फेटाळून लावलेत. हा मॉर्फ करून व्हिडिओ बनवलाय.. जर ड्रग्ज मिळतंय तर गृहखात कुणाकडे आहे, ते काय करतंय, हा सगळा खोटेपणा आहे, अशी टीका शिवसेनेचे उमेदवार प्रवीण तिदमेंनी केलाय. 

भाजपाच्या पायाखालची वायू सरकलीय. म्हणून हे सगळं केलं जातंय, असा आरोप दादा भुसेंनी केला आहे. तर दुसरी घटनाही भयंकर होती..  नाशिकच्या सातपूर भागात प्रभाग क्रमांक ११ मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान एकानं थेट बंदूक ताणली. प्रचाराला न फिरण्याची धमकी देणा-या युवकाला जमावानं चोप देत, पोलिसांच्या ताब्यात दिलं. बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढणा-या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता आहे, असा आरोप आपनं केलाय. पोलिसांनी याचा तपास केला जातोय, अशी माहिती दिलीय. 

मतदानाच्या एक दिवसआधी मित्रपक्ष भाजप-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. एकमेकांसोबत सत्तेत बसणारे नेतेच पालिका निवडणुकीत एकमेकांची उनीधुणी काढत असल्यामुळे
नाशकात चांगलंच वातावरण तापलं आहे..

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More