Suresh Dhas In Trouble: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईसाठी पारपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याशी धस यांचे जवळचे संबंध असल्याचं अधोरेखित करत धस यांच्या आशीर्वादानेच खोक्या बेकायदेशीर कामं करत होता असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
"सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्याचे जवळचे संबंध आहेत. सुरेश धस यांच्या आशीर्वादानेचे खोक्याकडून हरण, काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी," अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. याबरोबरच, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धसांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. तसेच सुरेश धस आणि खोक्या भोसले याची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल," असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश धस यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आपले कारनामे खोक्याने बाहेर काढू नये यासाठी सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र धसांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्यावा," अशी मागणी नवनाथ वाघमारे करत आहेत.
नक्की वाचा >> कोकणात राजकीय भूकंप? मोठं नेतृत्व ठाकरेंची साथ सोडून BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षात?
मागील आठवड्यात खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या ग्लास हाऊसवर वन विभागाने कारवाई केली. यानंतर काही अज्ञातांनी हा परिसर पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. सदरील घटना घडल्यानंतर सुरेश धस यांनी भोसले कुटुंबाची भेट घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याचं दिसून आलं होतं. वनविभागाने हे घर कोणत्या नियमाने पाडले त्याची उत्तर मिळणे गरजेचे असल्याचं धस यांनी म्हटलं होतं.
नक्की वाचा >> 'मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही', इफ्तार पार्टीत अजित पवारांचा शब्द; म्हणाले, 'कायदा आपल्या...'
"सतीश भोसले एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून त्याला दाखवलं गेला. त्याच्यावर 307 चा गुन्हा दाखल असून तो अटकेतही आहे. मात्र वन विभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता?" असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला होता.