'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा...'

कोकणातील दोन मंत्री नितेश राणे आणि योगेश कदम आपापसात भिडले आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 28, 2025, 09:48 PM IST
'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा...'

कोकणातील दोन मंत्री नितेश राणे आणि योगेश कदम आपापसात भिडले आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे. 

दापोलीत दोन गटात झालेल्या वादाच्या मुद्यावरून महायुतीमधील दोन मंत्र्यांमध्येच संघर्षाची ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे कोकणातील हे दोन मंत्रीच आमनेसामने आलेत. योगेश कदम यांच्या मतदारसंघात सभा घेऊन नितेश राणे यांनी थेट योगेश कदमांनाच इशारा दिला होता. नितेश राणेंनी दिलेला इशारा योगेश कदमांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनाच गर्भित इशारा दिलेल्या राणेंना योगेश कदमांनी सुनावलं.

नितेश राणे - 
FIRमध्ये नाव आलं नसेल, त्यांना कोण वाचवतंय? ते आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत

योगेश कदम - 

नितेश राणे माझे मित्र, माझ्याच मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवू नका

दापोलीमधल्या एका वादाच्या घटनेवरून नितेश राणेंनी योगेश कदमांना धारेवर धरलंय.

 

- दापोलीत काही महिन्यांपूर्वी दोन गटांमध्ये वाद झाला होता
- या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता
- FIR मधून जाणीवपूर्वक काही लोकांची नावं वगळल्याचा आरोप राणेंनी केला
- FIRमधून नावं वगळल्याच्या मुद्यावरून राणेंकडून योगेश कदम टार्गेटवर

कोकणातील या दोन मंत्र्यांमधील वादावरून काँग्रेसनं सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. महायुतीमधल्या मंत्र्यांची ही भांडणं उघड्यावर आल्यानं काँग्रेसनंही यात हात धुवून घेत महायुतीला डिवचलं आहे. 

शिवसेनेनं याप्रकरणात सामंजस्याची भूमिका घेतली आहे. दोन नेत्यांमध्ये वाद होत असतानाच महायुतीत कुठलीही दरी निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय.

महायुतीच्या कॅबिनेट मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधकांना हे आयतं कोलीत मिळालं आहे. येत्या काळात यावरून पक्षप्रमुख दोन्ही नेत्यांची कानउघाडणी करतात का, हे पाहावं लागणार आहे.