ठाकरेंची एकी, कोणाला पोटदुखी? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून भाजपचा उद्धव आणि राज ठाकरेंवर निशाणा

मनसेच्या दीपोत्सवालाही ठाकरे बंधूंनी सहकुटुंब हजेरी लावलीय, दरम्यान यानंतर भाजपनं  ठाकरे बंधूंवर टीका केलीय. तर भाजपच्या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आलाय.  

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 18, 2025, 09:16 PM IST
ठाकरेंची एकी, कोणाला पोटदुखी? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून भाजपचा उद्धव आणि राज ठाकरेंवर निशाणा

Thackeray Brothers Yuti News : राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा. मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. पुढच्या काही दिवसांत निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याने ठाकरे बंधूंनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिवाळीतच युतीची घोषणा होणार का? असा प्रश्न राजकीय गलियार्‍यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Add Zee News as a Preferred Source

मात्र, या चर्चांवर आता भाजप आणि शिंदे गटानं जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. “हिंदुत्वाचं राजकारण हे केवळ फोटोसेशनसाठी नाही, तर ते आचरणात आणावं लागतं,” अशा शब्दांत शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ठाकरेंच्या युतीवर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज्याच्या राजकारणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ही केवळ माध्यमांतून चर्चेत राहण्यासाठीची युती आहे.”

भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी तर थेट हल्ला चढवत म्हटलं, “उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातील जनता त्यांना ओळखते. हिंदुत्व आणि मराठीच्या नावाखाली पुन्हा एकदा भावनांवर राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे.”

युतीच्या शक्यतेबाबत मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संकेत दिलेत. त्यांनी म्हटलं, “राजकारणात काहीही अशक्य नाही. दोन्ही पक्ष मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले तर त्यात गैर काय?” या विधानानंतर ठाकरे युतीच्या चर्चांना अधिकच वेग आला आहे.

दोन दशकांनंतर एकत्र आले ठाकरे बंधू

मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एका राजकीय मंचावर दिसले. दीपोत्सवाच्या कार्यक्रमातील त्यांच्या भेटीने चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून पुढील काळातही या भेटींचं सत्र सुरू राहणार असल्याची माहिती मिळते.

आता सर्वांच्या नजरा या युतीच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत. दिवाळीनंतर ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

FAQ

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची सध्याची स्थिती काय?

सध्या युतीची चर्चा तीव्र असून, शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी घोषणा केली की, "ठाकरे बंधूंची युती पक्की" आहे. ही युती मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे महानगरपालिका (TMC) आणि इतर स्थानिक निवडणुकीसाठी असल्याचे सांगितले. मनसे दीपोत्सव कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाची एकत्रित उपस्थिती याला पुष्टी देते.

मनसे दीपोत्सव कार्यक्रमात काय घडले?

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मनसे दीपोत्सव कार्यक्रमात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव एकाच गाडीत, तर आदित्य-अमित दुसऱ्या गाडीत प्रवेश करताना दिसले. ही २० वर्षांनंतरची ठाकरे बंधूंची एकत्रित राजकीय उपस्थिती असून, याने युतीच्या चर्चांना वेग आला.

भाजपची युतीवर प्रतिक्रिया काय आहे?

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंवर टीका केली. "हिंदुत्वाचं राजकारण हे केवळ फोटोसेशनसाठी नाही, तर ते आचरणात आणावं लागतं," असं म्हणत त्यांनी युतीला "भावनांवर राजकारण" म्हटले. भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनीही म्हटले की, ही युती "अस्तित्व टिकवण्यासाठी" असून, जनता त्यांना ओळखते.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More