'मुंबई महाराष्ट्राची नाही', भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान! फडणवीस, शिंदेंना सवाल; 'तुम्ही त्याच्या लुंगीत..'

BMC Election 2026 Mumbai Does Not Belongs To Maharashtra Comment: मुंबईमधील प्रचारादरम्यान भाजपाच्या नेत्याने केलेल्या या विधानावरुन नवीन वादाला सुरुवात झाली आहे. नेमकं काय म्हटलंय या नेत्याने आणि त्यावरुन विरोधकांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊयात

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 10, 2026, 11:35 AM IST
'मुंबई महाराष्ट्राची नाही', भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान! फडणवीस, शिंदेंना सवाल; 'तुम्ही त्याच्या लुंगीत..'
जाहीर कार्यक्रमात भाजपा नेत्यानं केलेल्या विधानानं नवा वाद (प्रातिनिधिक फोटो)

BMC Election 2026 Mumbai Does Not Belongs To Maharashtra Comment: महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेवर असतानाच भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने मुंबई महाराष्ट्रातील शहर नाही असं वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील प्रचारादरम्यान केलेल्या या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. याच वक्तव्यावरुन खासदार संजय राऊत यांनी 'सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबईला कोणी महाराष्ट्रापासून तोडणार नाही' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाक्याची आठवण करुन देत त्यांच्यावरच निशाणा साधला आहे.

Add Zee News as a Preferred Source

तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन...

तामिळनाडूमधील भाजपाचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईतील एका प्रचार रॅलीदरम्यान, "बॉम्बे हे महाराष्ट्रातील शहर नाही तर अंतरराष्ट्रीय शहर आहे," असं वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावरुन भाजपा अडचणीत आलेली असतानाच संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या तोंडात या विषयावर बोलताना कापडाचा बोळा कोंबला आहे का? असा सवाल करत टीका केली आहे. "या विषयावर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. गर्जना चांगली आहे. तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात. याचं उत्तर फडणवीस आणि शिंदेंच्या पक्षाने दिलं पाहिजे," अशी मागणी राऊत यांनी केली.

ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय त्यांचा स्वाभिमान कुठं आहे आता?

"मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतात. हा जो कोणी अण्णा, झण्णा, फन्ना आहे त्याचा जो विचार आहे तो भाजपा आहे का? तो भाजपाचा नेता आहे ना? नेता असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध इथं महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीबद्दल तो असं कसं काय विधान करु शकतो? महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी प्राण देणाऱ्या 106 हुतात्म्यांचा हा अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. उद्या कोणी लुंग्या-सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून आमच्या तोंडावर चप्पल मारुन जाईल तर कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा. ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय किंवा जे स्वत:ला शिवसेना म्हणून मिरवतात त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? त्यांच्या तोंडात आता का गोळा आहे? सरकारच्या थोबाडात मारुन गेला. कृपाशंकर म्हणजे उत्तर भारतीय महापौर होईल. अण्णामलाई सांगतो मुंबई महाराष्ट्राची नाही. मुंबई महाराष्ट्राची नाही तर पाकिस्तानची आहे का? फडणवीसांनी यावर उत्तर दिलं पाहिजे," असं राऊत म्हणाले.

त्याच्या लुंगीत तोंड लपवणार का?

एवढ्यावर न थांबता हिंदीमधून याच विषयासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना, "तामिळनाडूतून आलेला तुमचा स्टार प्रचारक तुमच्या थोबाडीत मारुन गेला अण्णामलाई. आता तुम्ही त्याच्या लुंगीत तोंड लपवणार का? मुंबई महाराष्ट्राची नाही ही सुरुवात आहे. आणि हे विधान चाचपणी आहे," असंही राऊत म्हणालेत. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More