'मुंबईतल्या नोकऱ्या यूपी-बिहारच्यांना...' राज ठाकरेंनी घेतला समाचार; 'चार पैसे मिळाल्यावर...'

Raj Thackeray on Mumbai Job: महाराष्ट्राने तुमच्यावर उपकार केले आहेत हे विसरु नका, असे राज ठाकरेंनी मुजोरी करणाऱ्या परप्रांतियांना सुनावले. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 10, 2026, 02:47 PM IST
'मुंबईतल्या नोकऱ्या यूपी-बिहारच्यांना...' राज ठाकरेंनी घेतला समाचार; 'चार पैसे मिळाल्यावर...'
राज ठाकरे

Raj Thackeray on Mumbai Job: मुंबई पालिकेची निवडणूक काही दिवसांवर आलीय. सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान मुंबईतील विविध मुद्द्यांवरुन ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झालेले दिसतायत. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमसलेश सुतार या विशेष कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाजप सरकारवर निशाणा साधला.  काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईच्या राजकारणात सुरुवातीला दक्षिणेकडील लोक बँका आणि इतर चांगल्या नोकऱ्या घेत असल्याने त्यांच्यावर टीका होत असे. नंतर उत्तरेकडील आणि आता जैन समाजाकडे लक्ष वेधले जात आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली, कमी विकसित राज्यांतून लोक येतात आणि विकसित महाराष्ट्रात राहून आम्ही इथला विकास करू, असे म्हणतात. तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन तिथे विकास करा, असे त्यांना राज ठाकरे म्हणाले. तुम्हाला तिथे काही करता आले नाही म्हणून रोजगारासाठी मुंबईत आलात. पैसे कमावल्यावर उर्मटपणे बोलता, पण महाराष्ट्राने तुमच्यावर उपकार केले आहेत हे विसरु नका, असे राज ठाकरे म्हणाले.

 'स्वतःचे राज्य सोडून...'

बाहेरील लोकांनी स्वतः विचार करावा की कोण त्यांचा फायदा घेतय किंवा त्यांचा वापर करतय. त्यांना हे समजले पाहिजे. अन्यथा ते फक्त इतरांच्या हातातील बाहुले बनतील. महाराष्ट्रात येऊन ते स्थानिक लोकांना दुर्लक्षित करतात, पण त्यांचे स्वतःचे राज्य सोडून येण्याचे कारण म्हणजे तिथली गरीबी आणि कमी संधी. इथे मिळालेल्या संधीचा आदर करावा आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान द्या, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. 

राज ठाकरेंनी सुनावले 

मुंबईच्या नोकऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मिळाव्यात, सांगली, सातारा किंवा कोल्हापूरच्या लोकांना नाही, या वादग्रस्त विधानावर राज ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले. असे बोलण्याची त्यांची हिंमत कशी होते? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे इथल्या नोकऱ्या आणि संधींवर पहिला हक्क महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचा आहे. बाहेरील लोक येऊन स्थानिकांना बाजूला करू शकत नाहीत. हे अन्यायकारक आहे आणि ते रोखले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. असे विधान इतर राज्यात केले असते तर तिथल्या नेत्यांनी काय केले असते? कदाचित कडक कारवाई केली असती. पण महाराष्ट्रातील नेते मात्र असे विधान सहन करतात आणि ते प्रोत्साहन देतात. हे दुर्दैवी असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करावे आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे. बाहेरील लोकांना मुंबईत येऊन स्थानिकांना आव्हान देण्याची परवानगी नसावी, असेही ते पुढे म्हणाले. 

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना हिंदीबाबत बोलताना पाहून आश्चर्य वाटते, असे राज ठाकरेंनी म्हटले. त्यांना सांगितले की, तुमच्याकडे भोजपुरी, अवधी, मैथिली सारख्या भाषा आहेत, त्यांचा अभिमान बाळगा. हिंदीच्या मागे का लागता? युपीतील चित्रपट भोजपुरीत येतात, हिंदीत नाही. यातून तिकडे स्वभाषेला प्राधान्य असल्याचे दिसते. प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे, इतर भाषा लादू नये, असे राज ठाकरे म्हणाले. 

मराठीचा अभिजात दर्जा

भाषा आणि धर्म यांचा काही संबंध नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मराठी, गुजराती, तामिळ बोलणारेही हिंदू आहेत. भारत हे वेगवेगळ्या भाषांच्या प्रांतांचे संघ आहे, जसे युनायटेड स्टेट्स. इतिहासात आक्रमणे झाली तरी आपण सण-उत्सव सोडले नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण ती 1500-1800 वर्षे जुनी आहे. हिंदीला अजून तो दर्जा नाही, तरी ती लादली जाते. केरळ आणि कर्नाटकातही भाषावाद आहे, पण महाराष्ट्रात बोललो की देशाची एकता धोक्यात येते असे म्हणतात. हिंदीची सक्ती नाकारली पाहिजे आणि भाषेचा आदर केला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More