CBSE Pattern Formula: महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण कसे असेल? विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक यासाठी कितपत तयार असतील? शिक्षणाचा फॉर्म्युला काय असेल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.
येत्या 2025-26 या शैक्षणिक वर्षांपासूनच सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परीषदेत यासंदर्भात माहिती दिली. विधान परीषदेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भूसे यांनी लेखी उत्तर दिले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70 टक्के - 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.
सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यानंतर दरवर्षी एकेक इय्यतेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात, अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सुचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय.अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरु होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दहावीच्या मुलांचे वर्ग सुरु होतात. याच काळात दहावीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सुचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे दहावीच्या या वर्गांचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
मार्चमध्ये परीक्षा आटोपल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा एप्रिलमध्ये पहिल्या पंधरा दिवसांमध्ये काही अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. जूनमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करून वर्षाच्या शेवटी उजळणीसाठी वेळ मिळतो. मात्र यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दहा दिवस आधीच घेतल्या जात असल्यामुळे पुढील वर्षी देखील या वाया गेलेल्या दिवसांचा फटका बसणार आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये दहावीचे एक्स्ट्रा लेक्चर घेण्याचे नियोजन यंदा फसणार आहे. साहजिकच दहावीचा अभ्यास फेब्रुवारीत परीक्षेआधी संपवायचा कसा, असा पेच निर्माण झाला आहे. या दिवशी सर्व शाळांतील परीक्षा संपणार आहेत.सर्व इयत्तांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल अवघ्या पाच दिवसात देणे सर्वच शाळांना अवघड ठरणार आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याच्या धोरणाबाबत प्रशासनाने पुनर्विचार विचार करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.परीक्षा उशिरा घेण्याच्या निर्देशांमुळे शाळांचे वर्षभराचे नियोजन गडबडले आहे. हा निर्णय पुढील वर्षीपासून अंमलात आणावा, अशी मागणी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेकडून केली जात आहे. 23 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच 1 मेपासून सुट्टी द्यायची असेल तर चार ते पाच दिवसांमध्ये पेपर तपासणी करुन निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देणे अतिशय अवघड काम असल्यानेच प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं मुख्यध्यापकांच्या संघटनेचं म्हणणं आहे.