Atal Beemit Vyakti Kalyan Yojana: देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर नेहमी टीका होत असते. रोजगारी हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा असतो. केंद्र सरकारदेखील यासाठी विविध योजना राबवत असते. अलीकडेच केंद्र सरकारने विविध केंद्रीय योजनांतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना बेरोजगारीचे फायदे देण्याबाबत संसदेत माहिती दिली. गेल्या आठवड्यात झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार जीसी चंद्रशेखर यांनी देशातील बेरोजगार तरुणांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी बेरोजगारी भत्ता देण्याची मागणी केली होती. सरकारने याबाबत काही प्रस्ताव तयार केला आहे का? याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्यासाठी काही योजना असणार आहे का? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. यालाकामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी उत्तर दिले. युवकांच्या कल्याणाबरोबरच रोजगार निर्मिती हे सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी शासन सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत (एबीव्हीकेवाय) उमेदवारांना अर्ज करता येतो. पात्रतेनुसार विमाधारक कामगारांना याचा लाभ दिला जातो. बेरोजगारीवर योजना आणणे ही एक निरंतर आणि गतिमान प्रक्रिया असल्याचे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
यावेळी रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एका अहवालाचा हवाला दिला. गेल्या काही वर्षांत भारतात रोजगारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टक्केवारी पाहता रोजगारामध्ये सुमारे 36% वाढ झाली आहे. 2016-17 आणि 2022-23 दरम्यान सुमारे 170 दशलक्ष म्हणजेच 17 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत असा दावा सरकारकडून यावेळी करण्यात आला. तसेच भारताच्या आर्थिक वाटचालीतून प्रमुख क्षेत्रांमध्ये सतत रोजगार निर्मिती होत असल्याची माहिती रोजगार राज्यमंत्र्यांनी दिली.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने 'बस्टिंग द मिथ ऑफ जॉबलेस ग्रोथ: इनसाइट्स फ्रॉम डेटा, थिअरी अँड लॉजिक' हा अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यानुसार देशातील बेरोजगारीचा दर 2017-18 मधील 6% वरून 2022-23 मध्ये 3.2% पर्यंत घसरल्याचे म्हटले आहे.