`कोरोना पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी?`
कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी या धोरणांचा थेट कोणताही संबंध नाही. हे सारे निर्णय भविष्यासाठीचे निर्णय आहेत.
मुंबई: केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की, धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नुकतीच २० लाख हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून या पॅकेजचा तपशीलही जाहीर करण्यात आला होता. मात्र, अशोक चव्हाण यांनी या पॅकेजवर सडकून टीका केली आहे.
राहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात'
कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी या धोरणांचा थेट कोणताही संबंध नाही. हे सारे निर्णय भविष्यासाठीचे निर्णय आहेत. या निर्णयांमुळे या जागतिक महामारीविरूद्धच्या लढाईला बळकटी मिळत नाही. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांचे पूनर्गठन सुरू आहे. एवढे महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले जात असताना लोकशाही व्यवस्थेला विश्वासात घेण्याचे साधे सौजन्य दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकार नेमके कोणाचे भले करू पाहते आहे, याबाबत संशय निर्माण होत असल्याचे चव्हाण म्हणाले.
देशातील कोळसा उद्योग कात टाकणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा
केंद्र सरकारने आज कोळसा, खनिज, संरक्षण, उर्जा अशा अनेक क्षेत्रांबाबत दूरगामी परिणाम करणारे निर्णय जाहीर केले. कोळसा उत्पादन क्षेत्रातील केंद्र सरकारची मक्तेदारी संपवून खासगी उद्योजकांना परवानगी देणे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणे आदी निर्णय धोरणात्मक स्वरूपाचे आहेत. अशा निर्णयांच्या गुण-दोषांवर संसदेत चर्चा करून त्यानंतरच केंद्र सरकारने त्याची घोषणा करणे संयुक्तिक आहे. एवढेच नव्हे तर पुढील काळात बँकिंग क्षेत्रातही सुधारणा करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केले आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली असे निर्णय जाहीर करण्याचे औचित्य अनाकलनीय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तूर्तास केवळ कोरोनाचे निर्मूलन व पीडितांना भरीव मदत देण्याची भूमिका स्वीकारून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर संसदेत चर्चा करून पुढील आर्थिक धोरणे ठरवावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.