Mumbai Local Train Update: हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. अलीकडेच मध्य रेल्वेने हार्बर रेल्वे मार्गावर चालणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. मार्च 2024 पर्यंत प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे रूळाच्या लगत असलेले अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यानंतरच हे काम सुरू केले जाणार आहे. मुंबई विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील रेल्वेचा वेग सध्या 80 किमी प्रतितास इतका आहे. मात्र हा वेग वाढवून 105 प्रतितास इतका करण्यात येऊ शकतो. या योजनेवर सध्या काम सुरू असून मार्च 2024 पर्यंत याची अमलबजावणी केली जाणार आहे. 


मध्य रेल्वेवर अतिक्रमणची समस्या सर्वाधिक हार्बर रेल्वे मार्गावर आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वडाळा, मानखुर्द, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर येथे अतिक्रमण केल्याचे अधिक प्रकरण आहेत. ट्रॅकच्या जवळच अवैध बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम हटवता येत नाही कारण अनेकदा तिथल्या राजकीय नेत्यांचा विरोधाचा सामना करावा लागतो. रेल्वे रूळांशेजारी राहणारे लोक रुळालगतच प्रातःविधी करतात. तसंच, तिथेच कचरादेखील फेकतात. त्यांच्या घरातील पाणी कधीकधी ट्रॅकवर साचते. या सगळ्यांमुळं रुळांचे नुकसान होते आणि म्हणूनच लोकलचा स्पीड कमी होतो. 


रेल्वेकडून सोमवारी चुनाभट्टी ते जीटीबी नगर दरम्यान 165 अवैध अतिक्रमण हटवण्यात आली आहे. यात 140 लहान दुकाने आणि 25 झोपड्या आहेत. मध्य रेल्वेनुसार, चुनाभट्टी ते जीटीबी नगर दरम्यान आरपीएफ आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कठोर बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही स्थानकादरम्यान अप लाइनवर जास्त अतिक्रमण करण्यात आले होते. ते हटवण्यासाठी आधीही नोटिस दिली होती. 


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत उर्वरित अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटवल्यानंतर रेल्वेकडून इंजिनियरिंग वर्क सुरू करण्यात येईल. यात रुळांच्या मजबुतीकरणासाठी काम प्रामुख्याने करण्यात येईल. रुळांच्या खाली असलेली गिट्टी बदलण्यात येईल. अनेक ठिकाणी सिग्नलचे केबल्स बदलण्यात येतील. ही सर्व कामे झाल्यानंतर लोकल ट्रेनचा स्पीड वाढवण्यात येईल. 


हार्बर रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनचा स्पीज वाढल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यामुळं वेळेत घर किंवा ऑफिस गाठणे सोयीचे होणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना फायदाच होणार आहे.