)
विशाल करोळे, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर : बीडमध्ये ओबीसी समाजानं महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात काही नेत्यांनी जाहीरपणे छगन भुजबळांना ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून घोषित केलंय. त्यामुळे भविष्यातील ओबीसीच्या लढ्याचं नेतृत्व छगन भुजबळच करणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय.
बीडच्या सभेतील धनंजय मुंडे यांचं हे वाक्य येणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत कोण सारथ्य करणार हे सांगण्यास पुरेसं आहे. भुजबळ हेच आता ओबीसींचे मोठे नेते असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय आणि इथून पुढे लढ्याची सूत्र त्यांच्याच हातात असतील जणू असा एक इशाराच त्यांनी दिलाय. जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केल्यानंतर सर्वात आधी छगन भुजबळांनाच टार्गेट केलं होतं. त्यानंतर गेली दीड वर्ष राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू आहे.ओबीसींची एकजूट होऊ शकत नाही असा दावा अनेकदा केला जात होता. मात्र आता महाएल्गार मेळाव्यातून धनंजय मुंडेंसह गोपीचंद पडळकरांनी भुजबळांचं नेतृत्वच मान्य केलंय.
याबाबत लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय.छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेतच. मात्र ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी जो लढणार तो प्रत्येक जण ओबीसींचा नेता होईल हे सांगायलाही लक्ष्मण हाके विसरले नाहीत. तर मनोज जरांगे यांनीही भुजबळांवर हल्लाबोल केलाय. भुजबळांचा जामीन गृह मंत्रालयानं रद्द करावा ते दहशत पसरवत आहेत, असा घणाघात मनोज जरांगेंनी केलाय.
एकीकडं आता ओबीसी नेत्यांमध्येच ओबीसी विरुद्ध मराठा या लढ्याच्या माध्यमातून वाद लागल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे काही नेते मात्र भुजबळांना समोर करून आता लढ्याचं सारथ्य त्यांच्या हातात देताना दिसतायत. छगन भुजबळांच्या नावावर सर्वच ओबीसी नेत्यांचं एकमत होणार का, याकडे आता लक्ष लागलंय.
बीडमध्ये ओबीसी समाजाने काय आयोजन केले आणि त्यात काय झाले?
उत्तर: बीडमध्ये ओबीसी समाजाने महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात काही नेत्यांनी जाहीरपणे छगन भुजबळांना ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून घोषित केले. यामुळे भविष्यातील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व भुजबळच करणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांबाबत काय म्हटले?
उत्तर: धनंजय मुंडे यांनी म्हटले की, भुजबळ हे आता ओबीसींचे मोठे नेते असून, येणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत ते सारथ्य करतील. इथून पुढे लढ्याची सूत्रे भुजबळांच्या हातात असतील, असा इशारा त्यांनी दिला. गोपीचंद पडळकर यांनीही भुजबळांचं नेतृत्व मान्य केलं आहे.
मराठा आरक्षण लढाई आणि भुजबळांवरचा हल्ला कसा जोडला गेला?
उत्तर: जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केल्यानंतर सर्वात आधी छगन भुजबळांनाच टार्गेट केलं. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू आहे. यापूर्वी ओबीसींची एकजूट होऊ शकत नाही असा दावा केला जात होता, पण आता मेळाव्यातून एकजूट दिसली.