...नाहीतर दख्खनमध्ये स्वत:च्या कबरीसाठी जागा शोधून ठेव; शंभूराजेंनी औरंगजेबला लिहिलेलं पत्र

Chhatrapati Sambhaji Maharaj Letter To Aurangzeb: छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबच्या मुलीला लिहिलेलं हे पत्र भर दरबारात वाचण्यात आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 18, 2025, 02:40 PM IST
...नाहीतर दख्खनमध्ये स्वत:च्या कबरीसाठी जागा शोधून ठेव; शंभूराजेंनी औरंगजेबला लिहिलेलं पत्र
ते पत्र भर दरबारात वाचलं गेलं

Chhatrapati Sambhaji Maharaj Letter To Aurangzeb: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कल्पना मुघल बादशाह औरंगजेबलाही होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे सुपुत्र या ओळखीबरोबरच संभाजी महाराजांची आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर आणि कर्तुत्वावर आपल्या वडिलांइतकाच पराक्रम गाजवला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 120 हून अधिक युद्ध लढली आणि जिंकली. औरंगजेबने दगाफटका करुन संभाजी महाराजांना पकडलं आणि छळ करुन त्यांनी हत्या केली. एक काळ असा होता जेव्हा संभाजी महाराजांनी औरंगजेबच्या मुलाला आश्रय दिला होता आणि त्यांनी त्यावेळी औरंगजेबला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये संभाजी महाराजांनी औरंगजेबला दख्खन सोडण्याचा म्हणजेच दक्षिण भारतातून निघून जाण्याचा सल्ला दिला होता. दक्षिण भारत सोड नाहीतर आपल्या कबरीसाठी जागा शोधून ठेव असं संभाजी महाराजांनी औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं. ही भविष्यवाणी खरी ठरली. नेमकं काय घडलं होतं तेव्हा पाहूयात...

वडिलांकडून घेतली राजकारणाची शिकवण

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सयीबाई यांचे थोरले पुत्र होते. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झालेला. त्यांना अनेक भाषांचं ज्ञान होतं. इतिहासकारांच्या सांगण्यांनुसार अगदी लहान वयामध्ये संभाजी महाराजांनी वडिलांकडून राजकारणातील बारकावे शिकून घेतले. औरंगजेबचं बोलावणं आल्यानंतर शिवरायांनी अवघ्या नऊ वर्षांच्या संभाजी महाराजांना आपल्या सोबत नेलं होतं. आग्रा येथे औरंगजेबच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. मात्र तिथून हे दोघेही मिठाईच्या पेटाऱ्यांमधून मुघल बादशाहच्या हातावर तुरी देऊन निसटले होते.

मुलानेच केलं बंड

1681 मध्ये औरंगजेबचा चौथा आणि सर्वात प्रिय मुलगा मोहम्मद अकबर म्हणजेच अकबर द्वितीयने वडिलांविरोधात बंड पुकारलं. यामध्ये राजपूत राजा राणा राज सिंह आणि दुर्गा दास राठोड यांनी अकबर द्वितीयला मदत केली. तुम्ही औरंगजेच्या विरोधात बंड पुकारलं आणि मुघलांच्या शाही गादीवर बसण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करु असा शब्द या दोन्ही राजपूत राजांनी अकबराला दिला होता. मी अकबराला भरपूर खजिना आणि 40 हजार घोडे भेट म्हणून देईन असंही दुर्गा दास राठोडने म्हटलं होतं.

औरंगजेबचं मुलाला पत्र

दुसरीकडे औरंगजेबला जेव्हा मुलानेच बंड पुकारल्याचं समजलं तेव्हा तो दुखी झाला. याच दरम्यान 7 जानेवारी 1681 रोजी औरंजेबला अशी माहिती मिळाली की त्यांच्या मुलाने म्हणजेच अकबर द्वितीयने स्वत:ला बादशाह म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर औरंगजेबने मुलाला एक पत्र लिहिलं. त्यामध्ये औरंगजेबने, तू तर माझा आज्ञाधारक शहजादा होता. तू राजपूतांच्या बोलण्यात कसा अडकलास? लढाईमध्ये सहभागी होत पण मागे राहून लढ असा सल्लाही औरंगजेबने दिला. मात्र वडिलांनी अकबराला पत्र पाठवलं आहे असं समजल्यानंतर राजपूतांना वाटलं की अकबराने आपली फसवणूक केली आहे. यानंतर राजपूत राजांनी युद्धातून माघार घेतली. 

अकबर एकटा पडला, संभाजी महाराज मदतीला आले

राजपूतांनी माघार घेतल्याने अकबर एकटा पडला. एकीकडे औरंगजेबविरोधात शत्रुत्व पत्कारलं आणि दुसरीकडे राजपूतांनी ऐनवेळी कच खाल्ल्याने अकबराकडे एकमेव पर्याय उरला तो म्हणजे मराठ्यांच्या आश्रयाला येणं. त्याने तेच केलं. मराठा आणि मुघलांचं वैर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले तेव्हापासूनच होतं. अकबर बंड करुन मराठ्यांना शरण आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला बरीच मदत केली. याची माहिती मिळाल्यानंतर औरंगजेब स्वत: दख्खनच्या दिशेने कूच करु लागला. त्याने बंडखोरीमध्ये अकबराला मदत करणाऱ्यांना संपवलं आणि दख्खनमध्येच आपला तळ ठोकला. दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांनी अकबर द्वितीयची बहीण आणि औरंगजेबची मुलगी जीनतला एक पत्र लिहिलं जे नंतर औरंगजेबपर्यंत पोहोचलं.

दरबारात वाचलं छत्रपती संभाजी महाराजांचं पत्र

इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगजेबाला जेव्हा यासंदर्भातील माहिती मिळाली तेव्हा हे पत्र संपूर्ण दरबारासमोर वाचण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराजांनी जीनतला लिहिलेल्या पत्रामध्ये, "बादशाह सलामत (औरंगजेब) केवळ मुस्लिमांचे बादशाह नाहीत. हिंदुस्तानचे लोक वेगवेगळ्या धर्माचं पालन करतात. ते (औरंगजेब) ज्या विचाराने दख्खनला आले होते ते काम पूर्ण झालं आहे. आता मिळालेल्या यशाचं समाधान मानून त्यांनी दिल्लीकडे परतलं पाहिजे. एकदा आम्ही (संभाजी महाराज) आणि आमचे वडील (छत्रपती शिवाजी महाराजांनी) त्यांच्या तावडीमधून स्वत:ची सुटका करुन दाखवली आहे. जर ते (औरंगजेब) असेच अडून राहिले तर ते (औरंगजेब) आमच्या तावडीतून सुटून परत जाऊ शकणार नाहीत. त्यांची (औरंगजेबची)  खरोखर हीच इच्छा असेल तर त्यांनी (औरंगजेबने)  दख्खनमध्येच आपल्या कबरीसाठी जागा शोधून ठेवली पाहिजे," असं म्हटलं होतं.

महाराज जे बोलले तेच घडलं

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबला जे जे काही त्या पत्रात लिहिलेलं ते खरं करुन दाखवलं. आपल्या आयुष्यातील शेवटची 27 वर्ष मुघल बादशाह औरंगजेब दक्षिण भारत म्हणजेच दख्खन जिंकण्यासाठी झुंजत राहिला. संभाजी महाराजांना त्याने दगाफटका करत कैद केलं. तो मराठ्यांकडील छोटी छोटी राज्यं ताब्यात घ्यायचा मग मराठे ती राज्यं पुन्हा मिळवायचे. असा संघर्ष दोन तपांहून अधिक काळ सुरु राहिला. 

औरंगजेबचा शेवट

शेवटपर्यंत औरंगजेबला दख्खनवर ताबा मिळवता आला नाही. वयाच्या 88 व्या वर्षी औरंगजेबने मराठा सम्राज्याविरुद्ध जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगतच प्राण सोडले. इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च 1707 रोजी आहिल्यानगरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजी नगरमधील खुलताबाद येथे दफन करण्यात आलं.