झोपडपट्टीधारकच झाले मालक! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 2.5 लाख लोकांना होणार फायदा

Devendra Fadnavis on Lease Deed: राज्य सरकारने राज्यातील झोपडपट्टीधारांना दिलासा दिला असून, मालकी हक्क पट्टे देणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकूण अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 13, 2025, 02:24 PM IST
झोपडपट्टीधारकच झाले मालक! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 2.5 लाख लोकांना होणार फायदा

Devendra Fadnavis on Lease Deed: राज्य सरकारने राज्यातील झोपडपट्टीधारांना मोठा दिलासा दिला असून, मालकी हक्क पट्टे देणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकूण अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. "झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजेत अशी गेल्या 30- 40 वर्षांपासून साततत्याने मागणी होत होती. 2014 ला मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. तेव्हाही पट्टेवाटप सुरु केलं होतं. पण 2019 नंतर पूर्ण थांबलं होतं. आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले. सगळ्या जमिनींवर मालकी हक्क देता येईल असा निर्णय आम्ही घेतला," असं देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. 

Add Zee News as a Preferred Source

"आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले. एकूण अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल. नागपूर मॉडेल आम्ही तयार केल आहे. त्याचा जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. मुंबईत एमएमआरडीए मध्ये एसआरए करतो म्हणून त्यांना वगळता महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टीत लोक आहेत तिथे सगळीकडे ही जीआर लागू असेल," असं त्यांनी सांगितलं. 

Zee 24 Taas Impact: पालघरमधील मुलींच्या विक्रीची CM फडणवीसांनी घेतली दखल, चौकशीचे आदेश

 

"कोणाचं कच्चं घर असेल तर पक्क घर बांधण्यास पंतप्रधान आवास योजनेतून अर्थसहाय्य दिलं जाईल. 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, यात वेगवेगळे प्रोसेस असते ती सुरु आहे.  हे पट्टे बँकेबल आहेत, कुणाला कर्ज काढायचं असेल तर त्यांना कर्ज काढता येईल," अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांच्या नाराजीवर ते म्हणाले, "मला फार कोणात नाराजी असेल असं वाटत नाही. कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळाली पाहिजे असं वाटतं.  मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे, विकासन्मुख आणि पारदर्शक शासन आणणे  आणि त्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे". 

कल्याण-डोंबिवलीमधील जागांसंदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "फक्त 55 जागांची मागणी भाजप का करेल? भाजपा महत्त्वाचा पक्ष आहे. अजून कुठली मागणी केली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेस आमच्या 42 जागा आल्या होत्या, तिथे दोनच प्रमुख पक्ष आहे एक शिवसेना आणि दुसरा भाजप तिसरा पक्षाचा तिथे काही वजुद नाही, आम्ही आपसात बसून जागा वाटप करू". फॉर्म्युला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला आहे असंही ते म्हणाले. 

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावर ते म्हणाले की, "मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणं दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेलं आहे. यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता तक्रार दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते. वर्षभरात 90% च्या वर मुली परत आणतो. उरलेल्या पुढच्या वर्ष, दीड वर्षात परत येतात, त्यांनी नेमकं काय पत्र लिहिले आहे ते मी न वाचल्याने उत्तर देऊ शकणार नाही, मात्र ज्या काही शंका असतील त्यावर मी नक्की उत्तर देईन".

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More