नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खान आणि आरोपी युसूफ शेखच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला आहे. नागपूरच्या संजयबाग कॉलनीतील घरात आरोपीने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पालिकेनं त्याला नोटीस बजावत त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर फडणवीसांच्या बुलडोझर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा बुलडोझर पॅटर्न
नागपूर हिसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
आरोपी फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सुत्रधार फहीम खान आणि आरोपी युसूफ शेखच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्य़ात आला आहे. आरोपी फहीम खानच्या संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावत आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर फिरवलाआहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याबाबत चौकशी करण्यात येत असतानाच त्याच्या अनधिकृत बांधकामाची माहिती समोर आली. त्यानंतर पालिकेनं ही कारवाई केली.
नागपूरच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला. आता वाल्मिक कराड आणि प्रशांत कोरटकरच्या घरावरही बुलडोझर चालवणार का असा सवाल काँग्रस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर औरंगजेबाचा मुद्दा काढणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. कोकणात बुलडोझर पाठवणार आहात का? असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
अनधिकृत बांधकाम आहे हे आत्ताच महापालिकेला समजलं का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.