जयकुमार गोरे प्रकरणात CM फडणवीसांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'शरद पवारांच्या...'; सुप्रिया सुळेंचंही घेतलं नाव

जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 09:50 PM IST
जयकुमार गोरे प्रकरणात CM फडणवीसांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'शरद पवारांच्या...'; सुप्रिया सुळेंचंही घेतलं नाव

मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे.. या नेत्यांची नावंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केली आहेत. 

जयकुमार गोरे प्रकरणात  मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी SPचे नेते आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती

आरोपींचे सुप्रिया सुळे, रोहित पवारसोबत फोन कॉल्स असल्याची माहिती 

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे.. मुख्यमंत्र्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं नाव घेत या नेत्यांसोबत आरोपी महिलेचे फोन कॉल्स असल्याची माहिती सभागृहात दिली.

तर आम्ही कुठेही चुकलेलो नाही.. मात्र जयकुमार गोरेंना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक आमची नावं घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपलं नाव घेतल्याचं आश्चर्य वाटल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं नाव घेतलंय. त्यामुळे सध्या चर्चेत असलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.