जळगाव : खरा पैलवान कोण आहे, याचा फैसला २४ तारखेला महाराष्ट्रातील जनताच करेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते रविवारी जळगाव येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. काँग्रेसची अवस्था म्हणजे नेते बँकॉकला आणि कार्यकर्ते प्रचारात, अशी झाली आहे. अनेक विनवण्या केल्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार करायला तयार झाले. ते आता केवळ दाखवण्यापुरता तीन-चार सभा घेतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर शरद पवारांच्या पक्षाची अवस्थाही फारशी चांगली नाही. 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे हुए मेरे पिछे आओ', अशी त्यांची गत झाली आहे. इतकी वर्षे राजकारणात घालवल्यानंतर अशी वेळ आल्याने शरद पवार यांचा तोल जाताना दिसत आहे. त्यामुळे सोलापूरमधील सभेत त्यांचा तोल गेला आणि त्यांनी आक्षेपार्ह हातवारे केले. मात्र, आम्ही कधीही नटरंगसारखी कामे केली नाहीत. त्यामुळे आम्हाला तसे हातवारे करायला जमणार नाही. आता खरा पैलवान कोण, याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल, असे फडणवीसांनी सांगितले.


विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या आज राज्यभरात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी हेदेखील आज प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.