'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय!' मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; 'आम्ही काहीतरी आश्वासनं देतो कारण...'

Cabinet Minister Controversial Comments On Farmer: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अजित पवारांच्या पक्षातून सहकार मंत्री झालेल्या बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 10, 2025, 11:46 AM IST
'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय!' मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; 'आम्ही काहीतरी आश्वासनं देतो कारण...'
जाहीर कार्यक्रमात केलं विधान (प्रातिनिधिक फोटो)

Cabinet Minister Controversial Comments On Farmer: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नेते वादग्रस्त विधानांमुळे आणि कृत्यांमुळे चर्चेत असल्याने विद्यमान सरकार अडचणीत आल्याचं यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. वाल्मिक कराड कनेक्शनवरुन धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा देणं असो किंवा ऑनलाइन गेम प्रकरणावरुन माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद बदलून देणं असो अनेकदा असे प्रकार मागील काही काळात घडले आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांसहीत दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी आपआपल्या पक्षातील मंत्र्यांना जपून विधानं करण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला मंत्र्यांनी फारसा मनावर घेतल्याचं दिसत नाही. असं म्हणण्याचं कारण म्हणजे विद्यमान सहकार मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल केलेलं विधान!

Add Zee News as a Preferred Source

सहकार मंत्री नेमकं काय म्हणाले?

मराठवाड्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर जमिनीवरील पिकं उद्धवस्त झाली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 30 हजार कोटींहून अधिकची मदत जाहीर केली. यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किती दिली जाईल हे सुद्धा जाहीर केलं. असं असतानाच शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र कर्जमाफीच्याच विषयावरुन मंत्री बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

चोपाडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सहकार मंत्र्यांनी, "लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे," असं विधान केलं आहे. तसेच कर्जमाफीसंदर्भात बोलताना, "निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासने द्यावी लागतात," असेही बाबासाहेब पाटील म्हणालेत.

तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता

आम्ही काहीतरी आश्वासनं देतो कारण आम्हाला निवडून यायचं असतं असंही बाबासाहेब पाटील म्हणालेत. "आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास, निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं," असं विधान बाबासाहेब पाटील यांनी यावेळेस केलं. बाबासाहेब पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

कर्जमाफीचा विषय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच संवेदनशील विषय आहे. निसर्गाचा कोप झाल्याने अतिवृष्टीमुळे हाती आलेलं पिक गमावलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारकडून दिलाश्याची अपेक्षा असतानाच सरकारमधील मंत्रीच अशी विधान करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, भाजपाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर पत्रकारांशी बोलताना, "कोणीही सरकारमधल्यांनी अशी वक्तव्य करु नये," असं उत्तर दिलं आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More