सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेल्या 'या' अटींमुळे तुटली भावा-भावांची युती?

Conditions To Raj Thackeray By Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2025, 01:05 PM IST
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेल्या 'या' अटींमुळे तुटली भावा-भावांची युती?
शिंदेंच्या सेनेचा मोठा दावा (प्रातिनिधिक फोटो)

Conditions To Raj Thackeray By Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकरणामध्ये 19 वर्षांच्या संघर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा असतानाच आज महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी एक भेट घडली आणि या कथित मनोमिलनाच्या चर्चांना ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड एक तास राजकीय चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी या भेटीनंतर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकरांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरे बंधुची युती होण्याआधीच फिस्कटते की काय अशी जोरदार चर्चा आहे. अशातच उदय सामंत यांनी दोन्ही ठाकरे बंधूंमधील युती ही उद्धव ठाकरेंनी राज यांना घातलेल्या काही अटींमुळे फिस्कटल्याचा दावा केला आहे. 

हा त्यांचा अधिकार

फडणवीस आणि राज यांच्या भेटीसंदर्भात 'झी 24 तास'शी उदय सामंत यांनी चर्चा केली. राज आणि फडणवीस यांची भेट महायुतीमध्ये मनसे सहभागी होण्यासंदर्भात असेल तर आम्हाला आनंद असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका मांडताना उदय सामंतांनी म्हटलं आहे. "राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कुठे बैठका घ्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. आज वांद्र्याच्या हॉटेलमध्ये देवेंद्रजी आणि राज ठाकरेंची भेट होत असेल, त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितल्याशिवाय आपण बोलण्यात काही अर्थ नाही," असं उदय सामंत म्हणाले.

...तर ती सकारात्मक भेट समजून

पुढे बोलताना, "एक मात्र नक्की आहे महायुतीमध्ये येण्यासंदर्भात चर्चा होणार असेल तर एकनाथ शिंदेंची चर्चा होऊन याचा आम्हाला देखील आनंद होईल. ही भेट का झाली? कशासाठी झाली? त्यामध्ये काय बोलणं झालं हे तुम्हाला आणि मला देखील माहिती नाही. ते दोघे जाहीर करतील ते कशासाठी भेटले होते. ते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत बोलणं योग्य नाही. ही भेट महायुतीसाठी असेल असं म्हटलं तर ती सकारात्मक भेट आहे असं समजू," अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी नोंदवली आहे.

नक्की वाचा >> ठाकरे बंधूंची युती फिस्कटली? 'ते आम्हाला बांधील नाहीत, जाताना एक...'; फडणवीस-राज भेटीनंतर UBT ने स्पष्टच सांगितलं

...तर ते आमच्यासाठी सकारात्मकच

उदय सामतांना, "शीवतीर्थावर तुम्ही भेटीसाठी गेला होता? राज ठाकरेंनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं अशी तुमची आणि शिवसेनेची इच्छा आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंतांनी, "माझी इच्छा म्हणण्यापेक्षा, मी शिवसेनेत काम करतो. त्यामुळे त्यासंदर्भात आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे याबद्दलच निर्णय घेतली. महायुतीसंदर्भात बोलण्याबद्दल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. जे काही जाहीर करतील ते जाहीर करतील. त्यांची चर्चा सकारात्मक होत असेल तर ते आमच्यासाठी सकारात्मकच आहे," असं स्पष्ट केलं. 

राज ठाकरेंना घालण्यात आलेल्या अटी?

उदय सामंतांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना काही अटी घालण्यात आल्याचा दावा केला आहे. "ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यादरम्यान अशी भेट होत असेल तर या मनोमिलनाला ब्रेक लागतोय, खोडा घातला जात असल्याची चर्चा आहे," असं म्हणत उदय सामंतांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंतांनी दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या चर्चेदरम्यान उद्धव यांच्याकडून राज ठाकरेंना अटी घालण्यात आल्याचा दावा केला आहे. 

राज ठाकरेंना कोणत्या अटी घालण्यात आलेल्या?

"उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतत राज ठाकरेंना आमंत्रण मिळत होतं. मात्र त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यातली पहिली अट काय तर एकनाथ शिंदेंबरोबर बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही. देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं नाही, अमित शाहांची बोलायचं नाही. दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही. जसं आपण शालेय जीवनात भांडणं झाल्यावर एकत्रित येण्यासाठी तशा अटी-शर्ती पहिल्या प्रस्तावात ठेवण्यात आलेल्या हे आम्ही तुमच्याकडून ऐकलं आहे आणि बघितलं आहे. त्यावेळीही मी सांगितलं होतं, वैयक्तिक मत मांडताना म्हटलेलं की राज ठाकरे हे स्वतंत्र्य व्यक्तीमत्व असलेलं नेतृत्व आहे. अशा अटींसमोर ते झुकणार नाहीत. ते आज त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. ते देवेंद्रजींना भेटले असतील तर यांच्या अटींना त्यांनी जुमानलं नाही हे सिद्ध झालं," असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

अटी-शर्थींंच्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलं?

मात्र अशा काही अटी घालण्यात आल्याचा जावई शोध उदय सामंतांनी कुठून लावला? असा प्रश्न या विषयावर विचारलं असता ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. "उद्धव ठाकरेंकडून राज ठाकेरंना काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत का? फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंबद्दल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी असणार आहे?" असा सवाल अंधारेंना 'झी 24 तास'शी बोलताना विचारण्यात आला. 

या प्रश्नला उत्तर देताना सुषमा अंधारेंनी, "उदय सामंतांसारख्या नेत्याकडून अशी बालीश वक्तव्य मला अजिबात अपेक्षित नाहीत. मनसेचे प्रवक्ते स्वत: सांगत आहेत की आमच्यात अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही अटी-शर्ती घातल्या हा जावई शोध उदय सामंतांनी कुठून लावला? काय संबंध याचा? त्यांनी कुणाला भेटायला जावं आणि कोणाला जाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधील नाहीत. मात्र ते ज्या कृती करतील त्या महाराष्ट्राच्या फायद्याच्या आहेत की गुजरातला उद्योगधंदे पळवणाऱ्यांच्या? त्यांच्या कृती महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्या भाजपाच्या हिताच्या आहेत हे त्यांनी ठरवायचं आहे," असं उत्तर दिलं.