)
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरनंतर नंतर आता महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भविष्यात NDA सोबत जाण्यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी SPच्या ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात आणखी एक उलथापालथ होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे वृत्त नाकारलं आहे. NDAमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही असं सांगत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. "महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कोणताही नवीन पक्ष एनडीएत येण्याची चर्चा नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाहीत. पवारांच्या पक्षातील आमदार, खासदार कोणालाही फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही असंही ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याचं बोललं जातंय. या बैठकीत NDA ला पाठिंबा देण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी SPची NDAसोबत जाण्याची चाचपणी करते का? अशी चर्चा सुरू झालीय.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या 8 खासदार आणि 10 आमदारांची ताकद आहे. त्यामुळं ही ताकद सत्तेसोबत जोडायची की काँग्रेससोबत विरोधी पक्षातच राहायचं? याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलेलं. पण, आता पवारांशी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर खासदार आणि आमदारांशी चर्चा आणि चाचपणी करण्याची जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळं शरद पवारांचती राष्ट्रवादी पक्ष NDAला थेट पाठिंबा देणार की बाहेरुन मदत करणार याची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा आहे.
पक्षाकडून काँग्रेसऐवजी एनडीएसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रम निर्माण झालाय. शरद पवार NDAसोबत येत असतील तर आनंदच होईल असं म्हणत नवाब मलिकांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक म्हणाल्या. तर NDAमध्ये येण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाचा असतो, असं म्हणत सुनील तटकरे सावध प्रतिक्रिया दिली आहे.
पवारांच्या पक्षानं एनडीएबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही तर्क वितर्क लढवले जातायेत. राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेनंतर सत्ता की पुरोगामी विचार हे ठरवावं, असं विधान वडेट्टीवारांनी केलं आहे.. तर भाजपच्या गिरीश महाजन यांनीआमचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचंही सूचक विधान करत, या चर्चेला बळ दिल्याचं दिसलं.
पवारांची राष्ट्रवादीवरून राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असतानाच, शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावलीय. NDAसोबत जाण्याच्या चर्चा, तथ्य नाही. शरद पवारांचा पक्ष हा 60 वर्षे केवळ भाजपच्या विरोधात लढलेला पक्ष असल्याचं म्हणत रोहित पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला.
मागच्या आठवड्यातच पवारांचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी भाजपची ऑफर आल्यास विचार करू म्हणत खळबळ उडवून दिलेली. पण, यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी काहीशी माघार घेतली होती. पण, आता पवारांच्या पक्षाच्या हालचाली पाहता, अमोल कोल्हेंच्या त्या विधानाचा अर्थ आता स्पष्ट होताना दिसतोय. दोन्ही पक्षात सुरू झालेली चर्चा पाहता, पवारांच्या राष्ट्रवादी काय भूमिका घेते? पवार NDAला थेट पाठिंबा देणार की बाहेरुन मदत करणार? याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय..