मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. तर दुसरीकडे शेअर मार्केटही कोसळत आहे. कोरोना या जीवघेण्या आजारानं आता साऱ्या जगाला आपल्या कवेत घेतलंय. एकीकडे काही लोक या आजारामुळे मृत्यूशी झुंज देत आहे तर दुसरीकडे याचा थेट परिणाम जागतिक मंदिवरही होत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण जागतिक अर्थव्यवस्थेत GDP मधील चीनचा हिस्सा हा 19% आहे. यामुळे चीनमधून माल आयात करणाऱ्या देशांना याचा फटका बसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे भारतीयांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या सोन्यानं प्रती तोळा 44 हजारांचा टप्पा पार केलाय. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बसत असलेला फटका आणि बुडणाऱ्या बँक यामुळे आता गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिकही धास्तावलेत...त्यामुळे ते सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत... आणि जेव्हा जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा लोक सोन्याकडे वळतात त्यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढू लागतात.


गुडीपाढाव्यापर्यंत सोन्याचा भाव 50 हजारांपर्यंत जातो की काय अशी चर्चा आता सामान्यांमध्ये सुरू झाली आहे. कोरोनामुळे केवळ आरोग्यच नाही तर अनेक देशांची अर्थव्यवस्थाही खिळखिळी झालीये.. आणि हे संकट अनिश्चित काळापर्यंत राहाण्याची शक्यता आहे.



मुंबईतही शिरकाव ?


पुण्यात आढळलेल्या कोरोनाच्या दोन्ही रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूय. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिलीय. या दोघांना मुंबईतून पुण्यात आणलेल्या टॅक्सी ड्रायव्हलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


त्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालंय. या रुग्णांची ओळख उघड न करण्याचं आवाहन पुण्यातल्या विभागीय आयुक्तांनी नागरिकांना केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली जातेय असं त्यांनी सांगितलंय. हे दोन्ही रुग्ण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरायला गेले होते.