दहावी-बारावीच्या निकालाचा स्क्रीनशॉट स्टेटसवर ठेवणे ठरू शकते धोकादायक? कारण जाणून घ्या!

SSC-HSC Result And Cyber Crime: दहावीचा किंवा बारावीचा निकाल व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा सोशल मीडियावर शेअर करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. कारण जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: May 16, 2025, 09:50 AM IST
दहावी-बारावीच्या निकालाचा स्क्रीनशॉट स्टेटसवर ठेवणे ठरू शकते धोकादायक? कारण जाणून घ्या!
Cyber attacks surge in education institutions across country

SSC-HSC Result And Cyber Crime: नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे तर कोकण विभागाचा सर्वाधीक निकाल लागला आहे. निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन निकालाचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर शेअर केले आहेत. पण विद्यार्थ्यांचे निकाल सोशल मीडियावर शेअर करणे धोक्याचे ठरू शकते. अलीकडेच सायबर तज्ज्ञांनी याबाबतचे तोटे सांगितले आहेत. त्यामुळं प्रत्येक पालकांनी हे लक्षात ठेवलेच पाहिजेत. 

मुलांचा निकाल व्हॉट्सअॅप स्टेटसवर किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करत असाल तर वेळीच सावध व्हा. मुलांच्या कौतुकाने अनेक पालक मुलांना किती टक्के मिळाले हे सर्वांना कळावे या उद्देशाने निकालाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पण यामुळं काही काळ मुलांचे कौतुक होईलदेखील पण नकळतपणे तुम्ही सायबर चोरांना मुलांचा संपूर्ण वैयक्तीक डेटा शेअर करत असतात. मुलांच्या बाबतीतील संपूर्ण माहिती ही नकळतपणे शेअर केली जाते. त्याचा वापर सायबर भामट्यांकडून केला जातो. कसं ते जाणून घेऊयात. 

विद्यार्थ्यांच्या निकालावर त्यांचे नाव, जन्मतारिख ते बोर्डाचा सीट क्रमांक ही सगळीच वैयक्तीक माहिती असते. इतकंच नव्हे तर पालकांचे संपूर्ण नावदेखील निकालाच्या प्रतवर असते. तसंच, मुलांना किती टक्के मिळाले, कोणत्या विषयात किती गुण मिळालेत. शाळेचे नाव अशी सगळी माहिती दिलेली असती. ही सर्व माहिती सायबर चोरांसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळं सोशल मीडियावर निकाल शेअर करणे धोक्याचे ठरू शकते. 

 राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के

दहावीचा एसएससी बोर्डाचा निकाल यंदा 94.10 टक्के लागला इतका लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल 98.82 टक्के लागला असून नागपूर विभाग सर्वात कमी 90.78 टक्के  इतका लागला आहे. मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रु.-मार्च 2025 निकाल 1.71 टक्कांनी कमी लागला आहे.  यंदाचा निकाल 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. यंदा राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेत. 35 टक्के पडलेले 285 विद्यार्थी आहेत यंदा राज्यभरातून 75 टक्के पुढील विद्यार्थी 4 लाखाच्यावर आहेत.