)
Maharashtra Weather Alert Pune : संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे. विशेषतः पुण्यात दिवसाचे तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. रात्रीसुद्धा नेहमीपेक्षा जास्त उष्ण जाणवत आहे. आयएमडीनुसार, विदर्भात 16 मे पर्यंत, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 14 मे पर्यंत, तर मराठवाड्यात 15 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेने त्रस्त असून, अनेक भागांमध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईसह राज्यात पुढील तीन दिवस उष्माघाताचा धोका वाढणार आहे.. राज्यात पुढील 3 राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय... यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे... अकोला,अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोला आणि अमरावतीत पारा पुन्हा एकदा 45 अंशावर गेलाय. तर दुसरीकडे कोकणात उष्णतेची लाट नसली तरी तापमान अधिक असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्यातील शहरी भागांमध्ये किमान तापमानही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. मगरपट्टा येथे 28.1 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क येथे 27.6 अंश सेल्सिअस, लोहेगाव येथे 27 अंश सेल्सिअस आणि शिवाजीनगर येथे 26.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात तापमानाचा पार आणखी वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे आणखी काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आयएमडीच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, अकोला आणि अमरावतीसह संपूर्ण विदर्भ प्रदेशात 16 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढते शहरीकरण आणि घटत चाललेल्या हरित क्षेत्रामुळे 'अर्बन हीट आयलंड'चा (शहरी उष्णता बेटाचा) परिणाम अधिक तीव्र होत आहे, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित इमारत धोरणांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
वाढत्या उष्णतेमुळे आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या उकाड्यामुळे लोकांच्या त्रासात भर पडली आहे. डॉक्टरांच्या मते, उष्माघात आणि निर्जलीकरणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेरील कामे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्या आणि हलक्या रंगाचे, सैल कपडे घाला. तसेच, घर थंड ठेवण्यासाठी पडदे बंद ठेवा. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) देखील नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे आणि गरज भासल्यास हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.