Narsobachi Wadi Kolhapur History : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दत्त मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. असेच एक अनोखे मंदिर कोल्हापुरात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका मुस्लिम राजाने आपल्या मुलासाठी बांधले होते. ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ते ठिकाण महाराष्ट्राच्या दत्तसंप्रदायची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. हे पवित्र स्थळ आहे नरसोबाचीवाडी. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे.  कोल्हापूर शहरापासून सुमारे 45 कि.मी.अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या  पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.


नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून 51 किमीवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आहे. नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथील दत्त मंदिर देखील तितकेच अनोखे आहे. या मंदिराला कळस नाही. या मंदिराचे घुमट हे एका मशीदी प्रमाणे आहे.  इतर मंदिरात असते तशी दत्त महाराजांची मूर्ती या मंदिरात नाही. इथं दत्त पादुकांची पूजा केली जाते. 


दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या तीर्थाटनात नृसिंहवाडीत वास्तव्य केल्याची अख्यायिका आहे. नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले. यामुळेच वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते. 


हे मंदिर विजापूरचा बादशाह आदिलशाह या मुस्लिम राजाने बांधले आहे.  विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी, म्हणून प्रार्थना केली होती.त्याची प्रार्थना पूर्ण झाली. यानंतर त्याने हे मंदिर बांधले. आदिलशहाने मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही तर गोल घुमट आहे. 


नरसोबाची वाडी येथील दत्त जन्म सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून भाविक गर्दी करत असतात. दिगंबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात सकाळपासूनच नरसोबाची वा़डी निनादून गेली होती. जन्मसोहळ्यावेळी श्री दत्त महाराज यांचा पाळणा मंदिराच्या वरून खाली सोडला जातो. त्यानंतर पाळणा गायला जातो.. मंत्र पठण पूजाअर्चा संपन्न झाल्यानंतर सोहळा पूर्ण होतो. हा सोहळा याचि देही याची डोळी अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रासोबतच देशभरातून भाविक नरसोबाच्या वाडीला गर्दी करतात.