DCM Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्या दिवसापासून अनेक मुद्दे गाजले आणि आता हे अधिवेश सांगतेच्या दिशेनं जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही गोष्टींवर स्पष्ट मत मांडलं. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी, माजी खासदार संभाजीराजे यांनी केली असतानचा यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
'मला एक कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. आता हा सगळा काळ 80 ला महाराज गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये आहोत. का असे जुने मुद्दे काढले जातायत? ही समाधी आज आहे का? यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला. चव्हाण साहेबांपासून आताच्या देवेंद्रजींपर्यंत वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. अनेक पंतप्रधान रायगडला येऊन गेले, राष्ट्रपती येऊन गेले, वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले.
आता मध्ये कोणते ना कोणते मुद्दे काढले जातात. मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं मत असं आहे', असं म्हणताना लोकहिताच्या आणि व्यापक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवावं असं ठाम मत अजित पवार यांनी मांडलं.
आज आपल्या जगाच्या, देशाच्या राज्याच्या समोर AI चा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बटेजमध्येही मी याविषयी बोललो असं म्हणताना उपमुख्यमंत्र्यांनी AI चा शेतीपासून दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम अधिक प्रकर्षानं मांडला. अशा स्थितीमध्ये एखादं नवं वक्तव्य केलं जातं आणि तिथंच ही चर्चा सुरू होते. वास्तविक या चर्चांपेक्षा तरुण तरुणींना उद्योग देणं, रोजगार देणं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
कधी होणार पुढील अधिवेशन?
यंदाच्या वर्षी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली असून, दोन दिवस खास संविधानावर सभागृहात विशेष चर्चा होणार असल्याचं सांगताना या अधिवेशनाची सांगता होत असतानाच पुढील अधिवेशन जून, जुलैमध्ये नेमकं कधी होणार याविषयीचा निर्णय अध्यक्ष घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य करत राज्याला आर्थिक शिस्त लावणारा अर्थसंकल्प आपण सादर केल्याचं ते म्हणाले. 'मी यावेळी राज्याला आर्थिक शिस्त आणणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला. काहीनी कौतुक केलं, काहींनी टीका केल्या. राज्याची आर्थिक घडी मुख्यमंत्री आणि आम्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत चांगली राहिली पाहिजे. महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर नावलौकिक मिळत राहिला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत', असं ते म्हणाले.
कायदा, संविधान, मर्यादेच्या पुढे कोणीच जाऊ नये, असं म्हणत अजित पवार यांनी कुणाल कामरा प्रकरणी काही मुद्दे स्पष्ट केले. 'काहींची वैचारिक वक्तव्य असू शकतात. विचारधारा वेगळी असू शकते. पण ते मांडताना आणि चर्चा होताना त्यातून नवा प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं नवं काम निर्माण होणार नाही याचीही खबरदारी प्रत्येक जबाबदार नागरिकानं घेतली पाहिजे', असं अजित पवार म्हणाले.