Deepali chavan suicide case | धक्कादायक आरोप : ''दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमारला कोठडीत खायला मटण''

 RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित DFO विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत व्हीआयपी

Updated: Mar 30, 2021, 06:08 PM IST
Deepali chavan suicide case | धक्कादायक आरोप : ''दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमारला कोठडीत खायला मटण''

अनिरुद्ध दवाळे, झी २४ तास, अमरावती : RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित DFO विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, त्याला कोठडीत पंखा लावून देण्यात आला आहे, तसेच त्याला टीशर्ट आणि बर्मुडावर ठेवण्यात आले आहे, एवढंच नाही तर त्याला खायला मटणाचा डबा देखील दिला जात आहे, आरोपी शिवकुमार याची खाण्याची राहण्याची बडदाश्त अमरावती पोलिसांकडून राखली जात आहे, असा धक्कादायक आरोप अमरावतीचे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती पोलिसांवर केला आहे. दरम्यान आरोपी शिवकुमारला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

DFO विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून RFO दीपाली चव्हाणची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी दीपाली चव्हाण यांनी डोक्यात गोळ्या झाडून त्यांचं जीवन संपवलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं दीपाली चव्हाण यांनी म्हटलं आहे. वनविभागात RFO असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी ४ पानांची चिठ्ठी लिहिली आहे. 

यात त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. DFO विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली आहे. 

दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळ्या झाडण्यापूर्वी पतीला फोन कॉल केला होता, त्यात  तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते, तुम्हाला शेवटच बघायचं आहे, असं दीपाली यांनी म्हटलं होतं.

शिवकुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती, त्याला नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली होती. आता या विनोद शिवकुमार याची अमरावती पोलीस खास बडदाश्त ठेवतायत, त्याला कोठडीत पंखा आणि खायला मटण दिलं जात असल्याचा आरोप अमरावतीचे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती पोलिसांवर केला आहे.