'...तर मी राजकारण सोडून देईन', अजित पवार स्पष्टच बोलले, 'अंबानींबाबत वेगळा...'

Ajit Pawar on Dhirubai Ambani: माझ्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 16, 2025, 10:30 PM IST
'...तर मी राजकारण सोडून देईन', अजित पवार स्पष्टच बोलले, 'अंबानींबाबत वेगळा...'

Ajit Pawar on Dhirubai Ambani: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. माझ्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे असाही दावा त्यांनी केला आहे. काही प्रसारमाध्यमांनी माझ्याबद्दल काहीही दाखवलं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच जर आपण धीरुबाई अंबानी यांच्याबद्दल तसं विधान केलं असेल तर राजकारण सोडेन असं जाहीर विधानच त्यांनी केलं आहे. 

पाहुणेवाडी येथील प्रचारसभेच्या वेळी मी असं म्हणालो की, "एकेकाळी या देशाचे एक उद्योजक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. माझं विधान नीट ऐका, मी चॅनेल वाल्यांना सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडेन". 

बारामतीच्या पाहुणेवाडी येथील प्रचारसभेच्या वेळी अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विकास कामाबद्दल माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, "विविध सहकारी संस्थांना पेट्रोल पंप दिले आहेत. मी सहकार मोडीत काढायला निघालो नाही. त्या पेट्रोल पंपावरती चार मुलांना रोजगार मिळतो. कोणतंही काम छोटं नसत, पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी उद्योजक झाले". मात्र काही माध्यमांनी पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी उद्योजक झाले असं चालवलं. त्यावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

"मागे मी बोललो होतो त्याची जबरदस्त किंमत मोजली आहे. आम्ही पण जबाबदार राजकारणी आहोत. पण मीडियावाले काहीही चालवतात. मी लहानपणी धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडत होते हे ऐकलं होतं. म्हणून मुद्दामूव मी उदाहरणासाठी त्या गोष्टीचा उल्लेख केला. ज्या मीडियावाल्यांनी हे काम केलं त्यांच्याबाबत मी अतिशय खेद व्यक्त करतो", असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.