मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंचे दोन मोठे आदेश, 'टोल थांबवा अन् मिसिंग लिंक...'

Eknath Shinde on Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा असा आदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2026, 09:51 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंचे दोन मोठे आदेश, 'टोल थांबवा अन् मिसिंग लिंक...'

Eknath Shinde on Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी आणि पोलिसांना दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

"प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे. पण एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची  कुमक मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे  भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं," अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. 

दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वाहतुकीत बदल

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल करण्यात आला आहे. एक्सप्रेस-वे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

1) ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
2) माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)

लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे. असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More