`40 वर्षांनी शिवरायांच्या चरणी....`, फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला, `यांची तुतारी किती वाजते पाहू`
शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं. शरद पवारांसह पक्षाचे नेते यावेळी रायगडावर उपस्थित होते. दरम्यान यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर सर्वांचं लक्ष शरद पवार गटाकडे होतं. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव आणि ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. दरम्यान आपल्याया मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यासाठी शरद पवार गटाकडून रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवारही या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान यावरुन भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असून, अजित पवारांना याचं क्रेडिट द्यावं लागेल असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. "40 वर्षानंतर शरद पवार शेवटी रायगडावर गेले. अजित पवारांना याचं क्रेडिट द्यावंच लागेल. त्यांच्यामुळे शरद पवारांना 40 वर्षांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी जावं लागलं," असं ते म्हणाले आहेत. तसंच आता तुतारी कधी, कुठे, किती वाजते हे भविष्यात दिसेल असंही उपाहासात्मकपणे म्हटलं आहे.
दरम्यान लवकरच जागावाटपावर निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "जागावाटपासंदर्भात आमची एक बैठक झाली आहे. ही बैठक समाधानकारक झाली असून, आमची अजून एक बैठक होईल. आम्ही लवकरच जागावाटप करु," असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
दरम्यान राहुल नार्वेकर, नारायण राणे यांची नावं चर्चेत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "चर्चांवर नावं अंतिम होत नसतात. एक प्रक्रिया असते, ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नावं कळवण्यात येतील".
राज ठाकरेंचीही शरद पवारांवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. "छत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. छत्रपतींचे नाव घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत," असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली. शरद पवार यांना तुतारी निशाणी मिळाला आहे तर फुका असा टोलाही त्यांनी लगावला.