मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होऊन आता 7 दिवस होत आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अजूनही सापडत नाही. प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीच्या खातेवाटपाचं घोडं नेमकं कुठे अडलंय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारीवर आहेत. त्यामुळे या दिल्लीवारीतून नेमकं काय हाती लागणार याबाबत उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा होत आला पण अजून महायुतीचं खातेवाटप झालेलं नाही. अशातच आता हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आलंय. अजूनही खातेवाटप नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसेच विरोधकांकडून महायुतीवर टीका देखील होत आहे. 


दिल्लीवारीला निघालेल्या एकनाथ शिंदेंची प्रकृती ठिक नसल्यांनं त्यांनी दिल्लीला जाणं टाळलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहचलेत. खातेवाटपासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याला दांडी मारल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


रखडलेल्या खातेवाटपावर विरोधकांची टीका


भाजपकडे 137 आमदारांचं संख्याबळ असल्यानं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची राजकीय कोंडी झाल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय. दिल्लीच्या हायकमांडवरच भरवश्यावर राहावे लागेल. त्यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही. म्हणजे फांदी हलवायचं सोडाच पान देखील हलणार नाही. ऐवढी कोंडी या निकालाने या दोन्ही पक्षाची केली आहे. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  


तर महायुतीचे सगळे निर्णय आता दिल्लीत होऊ लागलेत. महायुतीचे अंतिम नेते आता अमित शाहा झाल्याची कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारलीय.


दिल्लीवारी नंतर महायुतीचे खातेवाटप होणार?


महायुती सरकाचा शपथविधी होऊन सात दिवस झाले आहेत. तर देखील अद्याप खातेवाटप झालेले नाहीये. जवळपास आठवडाभरापासून हे खातेवाटप झालेले नाहीये. त्यामुळे विरोधक देखील आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला गेल्याने खातेवाटपासंदर्भात चर्चा सुरु झालीये. आता या दिल्ली दौऱ्यात खातेवाटपाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा आहे.