देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बिनसलं? एकाच हॉटेलमधील असूनही भेटणं टाळलं

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये दुरावा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे  

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2025, 08:31 PM IST
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बिनसलं? एकाच हॉटेलमधील असूनही भेटणं टाळलं

संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे, फडणवीसांनी एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला असतानाही भेट घेणं टाळलं, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दुराव्याच्या चर्चांनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन्ही नेत्यांची भेट का झाली नाही? यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर विरोधकांनी मात्र, भाजप- शिवसेनेवर या मुद्द्यावरून टीका केलीय आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये दुरावा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं संभाजीनगरात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. मात्र, तरीही दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली नसल्यानं वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

शिंदे-फडणवीसांमध्ये अबोला? -

- रात्री 12 वाजता एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये आले

- त्यांच्यानंतर 12 वाजून 40 मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले

- एकनाथ शिंदे हॉटेलच्या दुस-या मजल्यावर मुक्कामाला

- तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिस-या मजल्यावर मुक्कामाला होते

- सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी एकनाथ शिंदे हॉटेलबाहेर निघाले

- तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 10 वाजता प्रचार सभेसाठी निघाले

 

एकाच हॉटेलमध्ये असूनही फडणवीस आणि शिंदेंची भेट न झाल्यानं विरोधकांनी भाजप-शिवसेनेला लक्ष्य केलं. तर दोन्ही नेत्यांची भेट का ली नाही? यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका हॉटेलमध्ये असून भेटले नाहीत, त्यावरून सर्व कळतं असं दानवेंनी म्हटलं आहे. तर सभा घेतल्यानंतर दोन्ही नेते थकले होते, नंतर भेट होणार असं संजय शिरसाट म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी पालघरच्या डहाणूतल्या प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमधल्या या वार-पलटवारानंतर दोन्ही पक्षातला संघर्ष समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. 

अहंकाविरोधात एकत्र आलोय, अहंकारामुळे लंका खाक झाली असं शिंद म्हणाले होते. तर श्रीरामांना मानणारा पक्ष त्याचा उमेदवार भरत लंका पेटवणार असं म्हटलं होतं. 

पालघरमधील या टीका टीप्पणीवर एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंटमधून स्पष्टीकरण दिलं होतं. कार्यकर्त्यांसाठी कधीकधी अशी विधानं करावी लागतात, तसंच या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचंही शिंदेंनी म्हटलं होतं.पालघरमधील टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली असल्याचंही शिंदे म्हणाले. 

भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याचं चित्र आहे. या दोन्ही पक्षातील संघर्षावर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा देखील झालीय.. मात्र, दुसरीकडे एकाच हॉटेलमध्ये असतानाही दोन्ही नेते एकमेकांना का भेटले नाहीत? यावरून आता राजकीय वर्तुळात
वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More