)
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून पगारदार मतदार तयार केले जात असल्याचा आरोप करुन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नव्या वादाला तोंड फोडलंय. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेनं तिखट टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचा अपमान केला असून येत्या निवडणुकीत लाडक्या बहिणी त्याचा बदला घेतील असा पलटवार शिवसेनेनं केलाय. तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच असे आरोप करत असल्याचा टोला फडणवीसांनी केलाय.
लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाजप पगारी मतदार निर्माण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे म्हणजे मतदार विकत घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बिहारमध्येही महिलांना एकरकमी दहा हजार रुपये देणे म्हणजे मतं विकत घेण्याचा प्रकारच असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर दिलं. विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही लाडकी बहीण योजनेवर आरोप केलेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना सरकार काहीतरी निमित्त काढून बंद करेल असा आरोप त्यांनी केलाय. विरोधकांनी केलेल्या आरोपांचा फडणवीसांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. विरोधकांनी केलेले आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून केल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय.
लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरुन नेहमीत जनमानसात उलटसुलट चर्चा होतात. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पगारी मतदार म्हणून उद्धव ठाकरेंनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय.
उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर काय आरोप केले?
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, भाजप लाडकी बहीण योजनेद्वारे पगारी मतदार तयार करत आहे. ही योजना मतं विकत घेण्याचा प्रकार असल्याचा आणि बिहारमधील महिलांना १० हजार रुपयांच्या एकरकमी मदतीसारखी असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर काय म्हणणं आहे?
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत अफवा पसरवत आहेत. त्यांनी उद्धवांच्या आरोपांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर दिलं.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी योजनेवर काय आरोप केले?
विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सरकार लाडकी बहीण योजना काही निमित्त काढून बंद करेल.