Babasaheb Ambedkar Marathwada University Exam Row: महाराष्ट्रातील बड्या विद्यापीठाच्या परिक्षेत मोठा गोंधळ झाला आहे. पदवी परीक्षेचं विचित्र वेळापत्रक जाहीर झाले आहे. एकाच सत्रात एकाच दिवशी सलग दोन वेगवेगळ्या पेपरच्या परीक्षा घेण्यात आल्या. दोन पेपर मध्ये केवळ 15 मिनिटांचं अंतर होते. दरवर्षी महिनाभर चालणाऱ्या परीक्षा यंदा केवळ आठच दिवसात संपणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा अनागोंदी कारभार पहायला मिळाला.
धाराशिव मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षेचे विचित्र वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. एकाच दिवशी ,एकाच सत्रात सलग दोन वेगवेगळ्या विषयांच्या पेपरची परीक्षा घोषित केल्या आहेत. म्हणजे सकाळी मराठीचा पेपर असेल तर अवघ्या पंधरा मिनिटानंतर भौतिकशास्त्राच्या पेपरची परीक्षा आहे. हे दोन्ही पेपर वेगळे वेगवेगळ्या विषयांचे आहेत.
कहर म्हणजे या पेपरमध्ये केवळ पंधरा मिनिटांची विश्रांती आहे. विद्यापीठाच्या या तुघलकी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर्वी विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा एक महिनाभर चालायच्या. यंदा मात्र या परीक्षा आठ दिवसात उरकण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. विज्ञान शाखेच्या परीक्षा तर केवळ तीनच दिवसात संपणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर याचा दुष्परिणाम होणार आहे.
विद्यापीठाचा हा प्रकार म्हणजे परीक्षा उरकिण्याचा घाट आहे अशी टीका होते. उद्याच्या 8 एप्रिल पासून विद्यापीठाच्या पदवीच्या द्वितीय ,तृतीय सत्राच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. एकट्या धाराशिव मधील विद्यापीठाच्या उपकेंद्रात हजारो विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. विद्यापीठातील एकूण परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या तर खूपच मोठी आहे. विद्यापीठाने या वेळापत्रकात बदल करून दररोज केवळ एकाच विषयाची परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.