Dhayri Crime: पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून मोठा दरोडा घालण्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेत नकली बंदुक दाखवून 25 ते 30 तोळे सोनं लुटण्यात आलं होतं. या विचित्र चोरीची पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. पण घटनेने आता धक्कादायक वळण घेतलंय.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भर दिवसा हा दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांकडून पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात टाकण्यात आलेला दरोडा चर्चेचा विषय बनला. यामुळे आजुबाजूच्या परिसरात दहशत पसरली होती. बंदुकीच्या धाकाने तीन जणांकडून सोन्याची लूट करण्यात आली होती. दरोडेखोरांनीं तब्बल 25 ते 30 तोळे सोनं पळवलं होतं. 3 जणांच्या टोकळ्याने हा दरोडा घातला होता. पण सर्व बनाव असल्याचे आता उघड झाले आहे.
धायरीतील तो नकली पिस्तुलाच्या धाकाने टाकलेला दरोडा देखील नकलीच निघाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सराफा दुकानदारानेच कामगारांना नकली दागिने चोरायला सांगून दरोड्याचा बनाव केला होता. कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्याच सराफ दुकानावर दरोडा टाकायला लावल्याची माहिती आता समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठी चोरांनी प्लास्टीकचे पिस्तुल वापरले होते. ते पिस्तुल मध्येच मोडले म्हणून बंदुकीचे सत्य लक्षात आले.
नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात ही घटना घडली होती. सोने खरेदी करण्याच्या बाहण्याने 3 जणांचे टोळकं दुकानात शिरले. बंदुकीचा धाक दाखवत यांनी जबरी चोरी केली. तपासात ही ही बंदूक प्लास्टिकची असल्याचे उघडकीस आले होते.