)
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : रवींद्र धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवरच्या आरोपांची मालिका सुरूच आहे. आधी जैन बोर्डिंग प्रकरण त्यानंतर बिल्डरची कार आणि आता थेट त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी ट्विट करत त्यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल गुन्ह्यांवरून धंगेकरांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळांवर टीकेची झोड उठवलीय.
राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण फसवणूक करतो. हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे. बाकी थेट जमीन चोरांचा सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात. मी या पोस्टसोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन अॅफिडेव्हिटमधील पानांची कॉपी जोडतोय मुरलीधर मोहोळांवर किती गुन्हे आहेत? ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.
जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरूनही रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना इशारा दिलाय. जोपर्यंत बळकावलेली जागा सोडत नाहीत, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलं. तर धंगेकरांच्या आरोपांवर भाजपनं देखील प्रत्युत्तर देत मोहोळांची पाठराखण केलीय.
धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर मोहोळांनी देखील धंगेकरांवर जमीन हडपल्याचा आरोप केला होता, मात्र, मोहोळांनी आरोप सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईन असं आव्हान धंगेकरांनी मोहोळांना दिलंय. त्यामुळे धंगेकरांचं आव्हान मोहोळ स्वीकारणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणारय.
घायवळ बंधूंवरून आधी चंद्रकांत पाटील आणि आता मोहोळांविरोधात धंगेकरांनी मोर्चा उघडलाय. त्यामुळे पुणे भाजप नेत्यांनी धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. यानंतर धंगेकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महायुतीत मिठाचा खडा पडू नये, याबाबतचा निरोप धंगेकरांना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
दरम्यान ज्या जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणावरून धंगेकरांनी आरोपांची राळ उठवलीय. त्या जागेचं खरेदीखत झी 24 तासच्या हाती लागलंय. या खरेदीखतामध्ये आणि ट्रस्टच्या डिडमध्ये विश्वस्थ मंडळाला ही जमीन विकण्याचा अधिकार नसल्याचं नमूद आहे. त्यामुळे ट्रस्टनं ही जमीन विकली कशी? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा सामना हा वैयक्तिक आरोपांवर येऊन पोहोचलाय. धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांच्या गुन्ह्यांची कुंडली काढत त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. तर दुसरीकडे जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणावरही तोडगा काढण्याची मागणी जैन समाजानं मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यामुळे या प्रकरणात सरकारकडून कोणती अॅक्शन घेण्यात येणार याकडे आता लक्ष लागलंय.