Disha Salian Murder Case Trouble For Aditya Thackeray Nitesh Rane Reacts: दिवंगत अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर नितेश राणेंनी, "ही सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या," असं सूचक विधान केलं आहे. नितेश राणेंनी, "या प्रकरणात पुढे लहान मुलांचा देखील विषय समोर येणार आहे," असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, असं मतही नितेश राणेंनी मांडलं आहे. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीपासूनच भूमिका मांडल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. "पहिल्या दिवसापासून मी या विषयावर भूमिका मांडली आहे. दिशा सालियानचा मर्डर झाला होता. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. आदित्य ठाकरेंचं लोकेशन तपासा. आज तिच्या वडीलांनी क्रिमिनल पेटीशन दाखल केलीय. त्यांनी सत्य सांगितले आहे," असं नितेश राणे म्हणाले.
"तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचविण्यासाठी काय काय केलं हे दिशा सालियानच्या वडिलांनी सांगितलं आहे. तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलाय. त्याला आवरा. आता त्याला कळेल चौकशी काय असते," असा टोला नितेश राणेंनी कोणाचंही थेट नाव न घेता लगावला असला तरी त्यांच्या टीकेचा रोख ठाकरेंच्या दिशेने असल्याचं दिसत आहे. "दिशा सालियानचा हत्या केल्याचा आरोप झालाय. आदित्य ठाकरेनं तोंड उघडावं. सत्य सांगण्याची हिंमत आदित्य ठाकरेंनं दाखवायला पाहीजे," असंही नितेश राणे म्हणाले.
"उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी सीसीटीव्ही गायब केले. वॅाचमनला गायब केलं. गोऱ्या गोमट्या चेह-यामागे मोठा बलात्कारी लपला आहे. यापुढे लहान मुलांचा काय रोल आहे हे पण समोर येईल," असं नितेश राणे म्हणाले.
"सत्यमेव जयते. तुम्ही खोटं लपवू शकत नाही. वडील सीएम होते म्हणून अत्याचार करणार का? आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहीजे. काही केलं नसेल तर चौकशीला समोर जायला पाहीजे," असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
"कोकाटेंवर कोर्टानं निर्णय दिलाय. नवाब मलिकचा राजीनामा घेतला होता का? मुलांचे नाव केसमध्ये आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला पाहीजे. त्या दिवशी पार्टीमध्ये लहान मुलांचा काय संबंध होता ते पण बाहेर येईल," असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.