)
Shivsena VS Shivsena UBT : एकनाथ शिंदे आज जे कोणी आहेत ते राजन विचारेंनी केलेल्या त्यागामुळे आहेत. त्यामुळे शिंदेंनी विचारेंचे पाय धुवून तिर्थप्राशन करावं असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवेसेनेनंही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेना विरुद्ध सेना सामना रंगलाय.
शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या फोटोशेजारी आनंद दिघेंच्या फोटो छापण्यावरू दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू झालेल्या सामन्याचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे आज जे कोणी आहेत ते राजन विचारेंनी केलेल्या त्यागामुळे आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी दररोज विचारेंचे पाय धुऊन तीर्थप्राशन करावं असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंवर शरसंधान साधलंय. तर संजय राऊतांनीच आमच्या 40 लोकांचे पाय धुऊन पाणी प्यावं असं म्हणत शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
तर दुसरीकडे ठाण्यातील आनंदाश्रमाच्या जागेवरुन खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीये. आनंदाश्रमाची प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे याचा तपास करावा असं राऊत म्हणाले. राऊतांनी शिंदेंवर केलेल्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय.
दरम्यान काल संजय राऊत यांनी जाहिरातीत बाळासाहेबांच्या फोटोशेजारी आनंद दिघेंचा फोटो छापल्यावरून शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्याविरोधात डोंबिवलीत शिवसेनेने निषेध आंदोलन केलं. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राऊतांवर बोलताना आमदार राजेश मोरेंची जीभ घसरली. तर आंदोलन करणारे गद्दार आहेत. त्यांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेबांच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू झालेली खडाजंगी आता थेट एकमेकांचे पाय धूवून पाणी पिण्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळे पुढल्या काळात तिर्थ आणि टीकांच्या प्रसादाचं हे पुराण कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आनंद दिघे यांच्या फोटोच्या मुद्द्यावरून वाद का सुरू झाला?
शिंदे गटाच्या जाहिरातींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापला जातोय. यावर संजय राऊत यांनी टीका केली की, आनंद दिघे हे केवळ जिल्हाप्रमुख होते, नेते किंवा उपनेते नव्हते. बाळासाहेबांच्या बरोबरीने त्यांचा फोटो का? असा सवाल उपस्थित केला. यामुळे शिंदे गटाने राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आणि ठाणे-डोंबिवलीत निषेध आंदोलनं झाली.
शिंदे गटाकडून संजय राऊत यांना कोणतं प्रत्युत्तर देण्यात आलं?
शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी राऊत यांना सडेतोड उत्तर देत म्हटलं की, राऊत यांनीच आमच्या ४० आमदारांचे पाय धुवून पाणी प्यावं. तसेच, डोंबिवलीत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं, ज्यात राऊत यांना "गद्दार" म्हटलं गेलं. एकनाथ शिंदे यांनीही राऊत यांना "अभ्यास करण्याचा सल्ला" दिला.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कोणती टीका केली आहे?
संजय राऊत यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे आज जे कोणी आहेत ते राजन विचारे यांनी केलेल्या त्यागामुळे आहेत. याचसंदर्भात त्यांनी शिंदेंनी रोज राजन विचारे यांचे पाय धुवून तीर्थप्राशन करावं असं व्यंग्यपूर्ण विधान केलं आहे. हा वाद राजन विचारे यांनी २०२२ च्या शिवसेना फुटीत आपलं तिकीट सोडून शिंदे गटाला दिल्यामुळे निर्माण झाला आहे.