Education News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष हे शालेय परीक्षांवर लागलं आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शालान्त परीक्षांना येत्या काही दिवसांतच सुरुवात होणार असून, त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत राज्य शासनानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे, तर त्यासंदर्भातील स्पष्ट सूचना शाळांना केल्या असून, विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा या सूचनांकडे लक्ष द्यावं.
राज्यात सध्या शालान्त परीक्षांचा माहोल सुरु असतानाच हवामानानं नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये येणाऱ्या उष्णतेच्या लाटांसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाह, मदत पुनर्वसन आणि महसूल विभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या. राज्यातील हवामानाच्या धर्तीवर जारी करण्यात आलेल्या या सूचनांनुसार पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या वेळेतच घ्याव्यात.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा 8 ते 28 एप्रिल दरम्यान घेण्याचे आहेश यापूर्वीच दिले असून, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांनी या सूचना सोयीच्या नसल्याचं म्हणत शासनानं जारी केलेल्या या निर्णयाला विरोध केला. ज्यानंतर आता थेट केंद्राकडूनच राज्यातील हवामानाचा आढावा घेत या सूचनांवर जोर दिला.
अशा सूचना पत्रकात अधोरेखित करत या सूचनांकडे शाळांनी कटाक्षानं लक्ष द्यावं ही बाब लक्षात आणून दिली आहे. विद्यार्थी, शिक्षकांना उष्णतेच्या लाटांच्या काळात काय उपाय करावे, याबाबत प्रशिक्षण देण्याचा पर्यायही केंद्राच्या विभागाकडून सुचवण्यात आला आहे.