)
Eknath Shinde Dasara Melava 2025 Live : मुंबईत आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या क्रमांकावरून टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकप्रियतेच्या नंबरवरून टीका केली. फडणवीसांचे वरून तरी खाली नंबर आला पण तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचा नंबर खालून नंबर 1 आला. ते विसरलात का? कोणावर टीका करताना किती वेळा रंग बदलणार. आजपर्यंत अशा प्रकारचा सरडा मी कधी पाहिला नाही. जो काही वेळातच रंग बदलतो असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, यापूर्वी लोकसभा आपण जिंकलो. विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपलाच विजय होणार आहे. अडीच वर्षात जे काम आपण केलं आहे ते काम लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. त्यासोबतच आता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेने 80 जागा लढवून 50 जागेंवर विजय मिळवला आहे.
कोणीही आला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचीच राहणार आहे. निवडणुका जवळ आल्याने तुम्ही हे बोलत आहे. पण, तुमच्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. जो मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शिवसैनिक करणार आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा धोक्यात आली असल्याचा आरोप शिंदेंनी केला. शिंदे म्हणाले, 'सावरकरांवर राहुल गांधी मुद्दाम टीका करतात आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. जर बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर त्यांनी तुम्हाला उलटे टांगून मिरचीची धुरी दिली असती. तुम्ही काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा हिंदुत्व सोडले.
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी म्हणून बाळासाहेबांचे विचार तुम्ही गाडून टाकले. जे बॉम्बस्फोटाचे आरोपी आहेत, ते तुमच्या प्रचारात दिसतात. एका खुर्चीसाठी तुम्ही सगळं गमावलं. पक्षाचा प्रमुख पक्षातील लोक संपवतो का? त्यामुळे तुम्ही पक्षप्रमुख नाही तर 'कट'प्रमुख आहात' असं म्हटलं आहे. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील जुनी वादाची ठिणगी पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
FAQ
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील मुख्य मुद्दा काय?
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात शेतकरी संकटावर भर दिला असून, पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम शिवसेना करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘धीर सोडू नका, टोकाचे पाऊल उचलू नका. शिवसेना तुम्हाला उभे करेल.’
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर काय टीका केली?
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या लोकप्रियतेच्या क्रमांकावर टीका केली. शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सांगितले की, ‘फडणवीसांचा नंबर खाली आला, पण तुम्ही CM असताना तुमचा नंबर खालून नंबर १ होता. किती वेळा रंग बदलणार?’
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘सरडा’ का म्हटले?
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘सरडा’ (रंग बदलणारा) म्हटले, कारण ते टीका करताना वेळोवेळी भूमिका बदलतात. ते म्हणाले, ‘आजपर्यंत अशा प्रकारचा सरडा मी पाहिला नाही, जो काही वेळातच रंग बदलतो.’