भाजप आमदारांकडून पुन्हा एकनाथ शिंदे टार्गेट, महायुतीत काय चाललंय?

Bjp On Eknath Shinde: अगोदर ठाण्याचा कोस्टल रोड आणि आता मुंबईच्या रस्त्यांवरुन भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना घेरलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 21, 2025, 08:45 PM IST
भाजप आमदारांकडून पुन्हा एकनाथ शिंदे टार्गेट, महायुतीत काय चाललंय?
एकनाथ शिंदे

Bjp On Eknath Shinde: भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय. मुंबईतील रस्त्यांवरुन भाजपनं विधानभवनात गंभीर आरोप केला आहे. शिंदेंच्या काळातील काँक्रिट रस्त्यांसंदर्भात हा आरोप करण्यात आलाय. दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंतांनी देखील आरोपांना उत्तर दिली आहेत.

अगोदर ठाण्याचा कोस्टल रोड आणि आता मुंबईच्या रस्त्यांवरुन भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना घेरलंय. एकनाथ शिंदेंच्या काळातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय. दरम्यान त्यांच्या आरोपांनंतर शिंदेंच्या शिवसेनेची मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईच्या रस्त्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते करण्यासाठी संपूर्ण मुंबई खोदली असून दररोज फक्त दीड-दीड किलोमीटर रस्ते होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच मुंबईतील सर्व रस्ते सीसीमध्ये करायचे आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

भाजप आमदारांनी केलेल्या आरोपांनंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीत रस्त्यांसंदर्भात एसआयटी नेमायची की नाही? यासंदर्भातली चर्चा बैठक होण्याची शक्यता आहे.मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे भाजपच्या टार्गेटवर असल्याची चर्चा आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या काळात काही कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.आणि आता मुंबईच्या रस्त्यावरुन देखील भाजपनं एकनाथ शिंदेंना घेरलंय.

'एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते', संजय राऊतांचा खळबळजनक दावा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये (Congress) जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.  एकनाथ शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) विचारा असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंड आहे असंही विधान त्यांनी केलं आहे. "एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडीमात्र संबंध नाही. भाजपाच्या ताटाखालचे मांजर झालेले ते लोक आहेत. त्यांच्या हातात भगवा नाही. ते सगळे भाजपाचे झेंडे आहेत. अजित पवारांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, एकनाथ शिंदे यांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करु नये," असं संजय राऊत म्हणाले आहेत.एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना एकदा विचारा, त्यांची मुलाखत घ्या. आज अहमद पटेल नाही आहेत, त्यामुळे फार चर्चा करायची नाही. व्यक्ती साक्ष देण्यास उपलब्ध नाही अन्यथा अहमद पटेल यांची दिल्लीत पहाटे दिल्लीत कोणाशी चर्चा झाल्या होत्या हे सर्वात जास्त मला माहिती असल्याचे ते म्हणाले.