Exclusive :फोन नॉट रिचेबल... शिवसेना फुटली तेव्हा कुठे होते? तीन वर्षांनतर भास्कर जाधव यांचा मोठा खुलासा

शिवसेनेच्या बंडावेळी भास्कर जाधवही नॉट रिचेबल होते. झी २४ तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात  झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या या स्फोटक मुलाखतीत भास्कर जाधव यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत.  

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2025, 10:51 PM IST
Exclusive :फोन नॉट रिचेबल... शिवसेना फुटली तेव्हा कुठे होते? तीन वर्षांनतर भास्कर जाधव यांचा मोठा खुलासा

Bhaskar Jadhav :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज ३ वर्ष पूर्ण झालीत.  या बंडावेळी मी नॉट रिचेबल नव्हतो, चुकीच्या बातम्या देण्यात आल्याचे सांगताना  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कार जाधव यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितले.  झी २४ तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात  झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या या स्फोटक मुलाखतीत भास्कर जाधव यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. 

एकनाथ शिंदेच्या बंडावेळी भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. भास्कर जाधवही बंडात सामील होणार होते, अशी चर्चा होती. यावर उत्तर देताना भास्कर जाधव यांनी २१ जूनचा किस्सा सांगितला.  जाधव म्हणाले, आठवण करा, मी जर नाराज असतो, तर अर्णब गोस्वामी प्रकरणात सरकारची बाजू मी परखडपणे मांडली नसती. मी शिंदेंसोबत कधीही गेलो नाही, आणि मला जर शिंदे सोबत जायचं असतं तर मी उघडपणे गेलो असतो, लपून छपून गेलो नसतो. मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं कारणही नसतं. 

२० तारखेला विधानपरिषदेच्या आमदारांचं मतदान झालं आणि मी माझ्या मतदारसंघात रेल्वेने निघून गेलो. रेल्वेत झोपलो होतो. रेल्वेत नेटवर्क नव्हते. मोबाईल लागत नव्हता. मी स्टेशनला उतरलो तर माझ्या मुलगा धावत स्टेशनवर आला. तो म्हणाला, टीव्हीवर बातम्या सुरू आहेत. भास्करराव नॉट रिचेबल. तर मी विचारलं काय झालं. त्यानं सांगितलं की आपल्या पक्षातील काही नेते गेले कुठेकुठे पक्ष सोडून... मला धक्का बसला, मी म्हटले, सर्व तर होते मतदानाला. दुसऱ्या दिवशी मी मुलाखत दिली, मी कुठेही गेलो नाही, अशा बातम्या देताना खात्री करत जा.

उद्धव ठाकरेंचा आला होता फोन 

गुहागरमध्ये पक्षाची मिटींग झाल्यावर उद्धव ठाकरेंचा मला फोन आल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितले. ठाकरेंनी मला त्वरीत मुंबईला निघून येण्यास सांगितले. त्वरित परतीची रेल्वे पकडली आणि पनवेल उतरलो. सरकार असताना यंत्रणा ढिसाळ होती. पनवेल ते वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी मला २ तास लागले. मला जर या काळात कोणी किडनॅप केले असते तर... यंत्रणेने एका एका आमदाराला कॅच करायला पाहिजे होते. पण तसं झालं नाही, याबाबत जाधव यांनी संताप व्यक्त केला. 

उदय सामंत खूप चलाख माणूस...

शिंदेसोबत नंतर गेलेले सर्व आमदार आणि मंत्री वर्षावर बसले होते. यात दादा भुसे, गुलाबराव पाटील, योगेश कदम, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि उदय सामंत होते. उदय सामंत हा सर्वात चलाख माणूस तो सर्वात नंतर गेला. उद्धव साहेबांवर शस्त्रक्रिया झाली होती, वाईटवेळी त्यांच्यावर या लोकांनी घात केला. कितीही मोठा दुश्मन असता तर त्याच्या विरोधात असं करायला नको होतं.  ते उद्धव साहेबांसोबत या लोकांनी केलं, असं चिडून जाधव यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरेंना थेट सांगितलं....

सर्व आमदार उपस्थित असताना मी उद्धव ठाकरेंना दोन गोष्टी स्पष्ट सांगितल्या, एक तुम्ही कुठल्याही पक्षासोबत जा मी तुमच्यासोबत आहे. पण ज्या भाजपसोबत तुम्ही ३५ वर्ष मैत्री केली. त्या भाजपने ज्या पद्धतीने तुमचा विश्वासघात केला.  त्या भाजपसोबत तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्यासोबत नाही. अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचा किस्साही भास्कर जाधव यांनी सांगितला. 

सर्व गेले तरी चालेल आपण दोघे राहू 

मी दाखवलेल्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्वरित सांगितले. सर्व आमदार गेले तरी चालतील आपण दोघे राहू. त्वरीत मी खासदारांच्या खोलीत गेलो आणि सांगितले ही वेळ आहे जोडायची तोडायची नाही. भाषा वापरताना प्रत्येकाने संयमाने वापरा. कोणत्या भाषेत आपण आपल्या सहकाऱ्यांच्या बाबत बोलतोय. जे गेले त्यांना मागे फिरवा अशी विनंती भास्कर जाधव यांनी खासदारांना केली होती असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. 
संपूर्ण मुलाखत रात्री ९ वाजता झी २४ तासवर पाहता येणार आहे.