'5 महिन्यात बारामतीकरांमध्ये असा काय...'; अजित पवारांनी सांगितलं अजूनही त्यांना न उलगडलेलं कोडं

Exclusive Local Body Election 2026 Ajit Pawar On EVM: अजित पवारांनी विशेष मुलाखतीमध्ये विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या ईव्हीएमसंदर्भातील आरोपांवर भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणालेत अजित पवार जाणून घेऊयात

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 12, 2026, 04:41 PM IST
'5 महिन्यात बारामतीकरांमध्ये असा काय...'; अजित पवारांनी सांगितलं अजूनही त्यांना न उलगडलेलं कोडं
अजित पवारांचं विशेष कार्यक्रमात भाष्य

Exclusive Local Body Election 2026 Ajit Pawar On EVM: 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएमसंदर्भातील दाव्यांवर भाष्य केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींमधील निकालांचा संदर्भ देत अजित पवारांनी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. 

Add Zee News as a Preferred Source

जनता जनार्दन सर्वस्व

"फडणवीस म्हणाले, निवडणुकानंतर सगळं सुरळीत होईल. निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढता. निवडणुका झाल्या की एकत्र बसता आणि राज्याचा कारभार हाकता. तर जनतेला गृहित धरलं जातं असं चित्र तयार होत आहे," असं म्हणत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी, "अजिबात नाही. जनतेला गृहित धरुन जो कोणी पुढे जाईल तो त्या क्षेत्रात टीकणारच नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे. आपण देशाच्या राजकारणात हे पाहिलं आहे. एक काळ असा होता इंदिराजींना कोणी हलवू शकत नाही असं चित्र होतं. मात्र जयप्रकाश नारायणजींनी असं आंदोलन केलं की कोणाच्या स्वप्नात नसतानाही देखील तिथं सरकार बदललं. अशा खूप घटना आहेत," असं उत्तर दिलं. 

...तर आमच्या 102 यायला पाहिजे होत्या

"2014 ला मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू होतं. त्यावेळी आताचे पंतप्रधान आणि त्यावेळेचे पंतप्रधान भाजपाचे नेते त्यांनी जसा प्रचार केला त्यामुळे पूर्णपणे भाजपाने देश व्यापून टाकला. चला ताजं उदाहरण देतो. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीसाहेब पुन्हा पंतप्रधान झाले. आपल्या महाराष्ट्रात 48 पैकी 17 जागा निवडून आल्या. आमच्या 31 जागा गेल्या. 31 जागांवर मतदारांनी आम्हाला नाही सहकार्य केलं. पाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे लोकसभेचा विचार केला तर आमच्या 102 यायला पाहिजे होत्या. त्यांच्या 186 यायला पाहिजे होत्या. आमच्या 238 आल्या त्यांच्या 50 आल्या. तोच मतदार आहे ना?" असं अजित पवार म्हणाले. 

मी बारामतीचा सर्व्हे केला

या उत्तरावर कमलेश सुतार यांनी, "मात्र त्या निकालावर शंका घेतल्या जातात ना? लोक प्रश्न उपस्थित करतात ना? राज ठाकरे, उद्धव ठाकरे इव्हीएमबद्दल बोलतात," असं म्हणत छेडलं. "मी स्वत: बघितलं आहे. ज्या वेळेस दारुण पराभव होतो तेव्हा आपण कशाचा तरी आधार घेतो. आपल्या मनाला रुचत नाही. दिलदारपणे कोणी पराभव मान्य करत नाही. ईव्हीएममध्ये काही होत नाही. मी बारामतीचा सर्व्हे केला. लोकसभेला 48 हजार मायनस आहे. विधानसभेला 1 लाख आणि वर काही हजार प्लस आहे. पाच महिन्यात बारामतीकरांमध्ये असा काय चमत्कार घडला. मीच प्रचार करत होतो," असं अजित पवार म्हणाले.  

कार्यकर्ते नजरेला नजरच देत नव्हते

"सगळ्या भारताला पडलेला प्रश्न आहे अनेक मतदारसंघात असं घडलंय," असं अजित पवारांना संदर्भ देत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवारांनी, "पण तो फॅक्ट आहे. लोकसभेला मी बोलायचो ना कार्यकर्त्यांशी ते नरजेला नजरच देत नव्हते. विधानसभेला म्हणायचे दादा तुम्ही महाराष्ट्र फिरा आम्ही इथं बघतो. ते कळतंय ना एवढा उत्साह दिसतोय तर गाडी कुठे तरी घसरली होती आधी. त्याचं मन त्याला कुठे तरी खुपतंय. आता म्हणे बघा कसा चालतो माझा बुथ वगैरे. त्यावरुन अंदाज येतो ना," असं अजित पवार मुलाखतीच्या शेवटी म्हणाले. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More