Raj Thackeray Alliance With Mahayuti: सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आता पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम असेल. अशातच वेगवेगळ्या पक्षांनी राजकीय हलचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही बैठकांमधून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच मंगळवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंत्री उदय सामंत पोहचल्याने राज ठाकरे महायुतीसोबत येणार अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान, राज महायुतीबरोबर जाणार का? चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'झी 24 तास'ने आयोजित केलेल्या 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025'चं वितरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांची मुलाखत 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतली. मुलाखतीदरम्यान फडणवीस यांना मनसेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज ठाकरे महायुतीसोबत येणार का याबद्दल सूचक विधान केलं असून चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकला आहे.
"राज ठाकरेंशी आम्ही नेहमी चर्चा करतो. लोकसभेच्या वेळी केली. विधानसभेच्या पूर्वीही केली. महानगरपालिकेच्या आधीही करु. पण त्या चर्चेतून निघेल काय हे सांगात येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे 'मुक्त विद्यापीठ' आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत. त्यामुळे त्यातून कोणाला डिग्री मिळेल, कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही," असं देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबद्दल म्हणाले.
या विधानावर कमेश सुतार यांनी 'मुक्त विद्यापीठ' याबद्दल थोडं सविस्तर सांगाल का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी, "त्यांना ज्यावेळेस ज्याच्यासोबत जायचं असतं त्यांच्यासोबत असतात. लोकसभेमध्ये ते आमच्यासोबत होते. विधानसभेत ते आमच्यासोबत होते की नव्हे ते फक्त आम्हाला माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे. इतर कोणालाच माहिती नाही. महानगरपालिकेला काय होईल हे नेमकं तेच ठरवतील," असं फडणवीस म्हणाले.
या पुरस्कार सोहळ्यात 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार' देऊन शंकर महादेवन यांना सन्मानित करण्यात आलं. शंकर महादेवन यांच्या गाण्याबद्दलही फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये भाष्य केलं. "शंकरजी यांचे शिव तांडव स्तोत्र मी आठवड्यात एकदा तरी ऐकतो. जगात त्या ऊर्जेने कुणी गाऊ शकत नाही. प्रवासात तर मी हे ऐकतोच," असं फडणवीस म्हणाले. तसेच, "सूर निरागसमुळे तर डोळ्यात पाणी येतं," असं म्हणत फडणवीसांनी शंकर महादेवन यांच्या गाण्याचं कौतुक केलं.