Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत हजारो एकरांची जमीन अधिग्रहण केली जात असून, या मोबदल्यात भूखंड मालकांना नेमकं काय मिळणार, हा मोबदला कोणत्या स्वरुपात असेल, त्याबाबतची सविस्तर माहिती...

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाला आता वेग मिळाला असून, नुकतीच या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 5 मे 2026 अर्थात या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सुमारे साडेचारशे एकर जमिनीचे करारनामे करण्यात आले. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर भूसंपादनाचं काम सुरू करण्यात आलं. जिल्हा प्रशासनानं याबाबतची माहिती दिली. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावातील 3 हजार एकर जागेची अंतिम निश्चिती करण्यात आली आहे.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या संदर्भात सविस्तर माहिती देणारी एक पत्रकार परिषद नुकतीच घेण्यात आली. ज्यामध्ये प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या जाणाऱ्या भूखंडांचा मोबदला नेमका किती दरानं देण्यात येईल याबाबतचा आकडासुद्धा सांगण्यात आला. अधिकृत माहितीनुसार सरकारनं हे दर निश्चित केले असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं.
शासनाच्या हवाल्यानं जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी दर एकर जमिनीसाठी 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये इतकी किंमत मोजली जाणार आहे. ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी जातील त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीसुद्धा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या 10 टक्के जमीन विकसित भूखंडाच्या स्वरुपात शेतकऱ्यांनाच परतही केला जाणार आहे ज्यामुळं हा परतावा 2 कोटींच्या घरात पोहोचणार आहे.
| गाव | जमिनीचं क्षेत्रफळ |
| उदाचीवाडी | 58.34 हे.आर |
| वनपुरी | 154.06 हे.आर |
| कुंभारवळण | 245.48 हे.आर |
| खानवडी | 269.22 हे.आर |
| मुंजवडी | 82.56 हे.आर |
| पारगाव | 188.07 हे.आर |
| घटक | मोबदला दर |
| आंबा | ₹50,000 – ₹60,000 |
| सिताफळ | ₹11,000 – ₹13,000 |
| अंजीर | ₹10,000 – ₹13,000 |
| नारळ | ₹4,000 – ₹6,000 |
| चिंच | ₹40,000 – ₹50,000 |
| चिकू | ₹13,000 – ₹17,000 |
| बाभूळ | ₹4,899 |
| कडूलिंब | ₹6,392 |
| बोर | ₹2,044 |
| निलगिरी | ₹11,783 |
| पिंपळ / वड / करंज | ₹21,979 |
| विहीर | ₹3 ते ₹17 लाख |
| बोअरवेल | ₹40,000 – ₹60,000 |
| पक्के घर | ₹3 लाख ते ₹40 लाख क्षेत्रफळानुसार ( 5700 प्रति चौरस मीटर) |
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्यांना नमूद सर्व घटकांच्या मूल्यावर 100% दिलासा देऊन दुप्पट मोबदला देण्याची हमी देण्यात आली आहे. 7 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर या व्यवहाराचे पैसे येण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. करारनामा होईल त्याच दिवशी आरटीजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील आणि ही संपूर्ण प्रक्रिया 10 जूनपर्यंत सुरू राहिल असं सांगण्यात आलं आहे. या तारखेनंतरची भूसंपादन प्रक्रिया ही सक्तीनं राबवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
जमीन अधिग्रहणासाठीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन येणं आवश्यक असून, कोणीही संभ्रमात राहू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रक्रिये सर्वांना एकसमान मोबदला दिला जाईल. सदर प्रक्रियेबाबत बनावट पत्र फिरत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक यांना गुन्हे नोंद करण्यास सागितल्याचं जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
2026 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरंदर विमानतळाचं काम सुरू होण्याची शक्यताअसून, यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याला शेअर होल्डर करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनाही फायदा झाला पाहिजे ही भूमिका डुडी यांनी मांडली. यामध्ये अडीच एकर पेक्षा कमी जागा असली पाहिजे, मूळ शेतकरी असणं अपेक्षित आहे अशा काही अटी त्यांनी सांगितल्या. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होते त्या शेतकऱ्यांनवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुरंदर विमानतळमध्ये सध्या अधिग्रहण करत असलेल्या भागात 6500 कुटुंब आहेत, यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी दिली जाणार असून, हे सर्वाधिक पॅकेज असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 3 वर्षाच्या आत विमानतळाचे काम पूर्ण होऊ शकते. पण भौगोलिक परिस्थिती पाहून काम केले जाईल यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान भर दिला.